खऱ्याखुऱ्या ‘डीजे’चा आवाज ‘एआय’ने बसवला
#न्यूयॉर्क
सध्या सगळीकडे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' अर्थात 'एआय'चा बोलबाला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विविध कामांमध्ये माणसांची जागा घेत आहेत. आता चक्क डीजेचे (डिजिटल जॉकी) कामही एआय करत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील एका रेडिओ स्टेशनने हा फुल-टाईम एआय-डीजे नेमला असून तो कामही करत आहे. विशेष म्हणजे रेडिओ स्टेशनचे कार्यक्रम ऐकणाऱ्यांनी या बदलाचे स्वागत केले आहे.
अल्फा मीडियाच्या 'केबीएफएफ ९५.५ एफएम' या रेडिओने फ्युच्युरी मीडियाने बनवलेल्या रेडिओजीपीटी सॉफ्टवेअरचा वापर सुरू केला आहे. या माध्यमातून त्यांनी अॅशले एलझिंगा या आपल्या होस्टचे आभासी रूप तयार करून घेतले आहे. आता हे एआय रूपच कार्यक्रम चालवत आहे. रेडिओ स्टेशनची निर्मिती क्षमता वाढवणे आणि प्रेक्षकांना वेळेवर आणि सर्वसमावेशक माहिती प्रदान करणे, या उद्देशाने कंपनीने हे पाऊल उचलले आहे. अल्फा मीडियाच्या मजकूर विभागाचे प्रमुख फिल बेकर यांनी ही माहिती दिली. रेडिओ ब्रॉडकास्टिंग सेवेतील एआयच्या क्षमतांबद्दल त्यांनी उत्साह व्यक्त केला. एआयच्या वापरामुळे स्टेशन पूर्वीपेक्षा अधिक गतिमान होऊ शकते. यासोबतच, मजकूर निर्माण करणाऱ्यांना वेगळ्या गोष्टींवर काम करण्यास मदत होते, असे मत फिल यांनी व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅशलेचे हे एआय व्हर्जन तिच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करते. अल्फा मीडियाने हे स्पष्ट केले की, यामुळे खऱ्या अॅशलेची नोकरी धोक्यात येणार नाही. अॅशलेची नोकरी कायम राहणार असून, तिला नेहमीप्रमाणेच पगार मिळणार आहे.