अमेरिकेच्या अध्यक्षांना वाळू ‘नडली’
#वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोलोरॅडो येथील एअर फोर्स अकादमीच्या कार्यक्रमात कोसळले. स्टेजवरील वाळूच्या पिशवीचा अंदाज न आल्याने त्यात पाय अडकून ते पडले.
एअर फोर्स अकादमीच्या पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी बायडेन येथे आले होते. भाषण दिल्यानंतर त्यांनी एका कॅडेटशी हस्तांदोलन केले आणि ते आपल्या खुर्चीच्या दिशेने जात असताना ते स्टेजवर कोसळले. या कार्यक्रमाच्या व्हीडीओमध्ये दिसत आहे की, बायडेन उभे राहताच त्यांनी बोटाने स्टेजकडे इशारा केला. तेथे काळ्या रंगाची वाळूने भरलेली पिशवी होती. यामध्ये बायडेन यांचा पाय अडकला होता.
बायडेन पडताच हवाई दलाचे अधिकारी त्यांना उचलण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी बायडेन यांना उचलले. त्यांना उठण्यास थोडा त्रास होत होता, मात्र उभे राहिल्यानंतर मदतीची आवश्यकता भासली नाही. व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लाबोल्ट यांनी ट्विट केले की, ‘‘अध्यक्ष ठीक आहेत आणि त्यांना दुखापत झाली नाही.’’
बायडेन हे अमेरिकेत अध्यक्षपद भूषवणारे सर्वात वयस्कर नेते आहेत. या ८० वर्षीय डेमोक्रॅट नेत्याने २० जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून त्यांनी अमेरिकेची सत्ता मिळवली होती. २०२४ मध्ये ते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.
बायडेन अडखळल्याच्या यापूर्वीच्या घटना
२३ फेब्रुवारी २०२३ : राष्ट्राध्यक्ष बायडेन पोलंडहून अमेरिकेला परतत होते. अमेरिकेला जाण्यासाठी एअरफोर्स वनच्या पायऱ्या चढत असताना त्यांचा तोल बिघडला आणि पायऱ्यांवर ते अडखळले. व्हीडीओमध्ये ते हाताच्या मदतीने उठताना दिसत आहेत. यानंतर ते स्वत:ची काळजी घेत विमानात बसले.
१६ नोव्हेंबर २०२२ : जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बायडेन बाली येथे गेले होते. तेथील खारफुटीच्या जंगलात फिरत असताना बायडेन यांचा तोल गेला. तेव्हा सोबत चालणाऱ्या इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना पकडले.
जून २०२२ : एका टीव्ही शोमध्ये मुलाखत देण्यासाठी बायडेन लॉस एंजेलिसला जात होते. त्यावेळी एअरफोर्स वनच्या पायऱ्या चढताना ते अडखळले.
मे २०२२ : एअरफोर्स बेसवर विमानात चढत असतानाही बायडेन पडता-पडता वाचले होते. तेव्हा कमांडर-इन-चीफने त्यांना पकडले होते.
२१ डिसेंबर २०२१ : बायडेन अटलांटा येथे आशियाई-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांना भेटण्यासाठी जाताना बायडेन तीनदा अडखळले. त्यावेळी वारा खूप जोरात होता, कदाचित त्यामुळे बायडेन यांचे संतुलन बिघडले, असे व्हाईट हाऊसने म्हटले होते.
वृत्तसंस्था