प्रवाशाने घेतले कर्मचाऱ्याचे जबरदस्तीने चुंबन
#अलास्क
गेल्या काही महिन्यांत विमानात लघुशंका करणे आणि केबिन क्रूसोबत वाद घालण्यापासून ते गैरवर्तन केल्याची डझनभर प्रकरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर विमानातील अशीच आणखी एक घटना पुन्हा समोर आली आहे. डेल्टा एअरलाईन्सच्या विमानात एका प्रवाशाने पुरुष अटेंडंटचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याची घटना समोर आली आहे.
अमेरिकेतील मिनेसोटा शहरातून अलास्काला जाणाऱ्या विमानात एका ६१ वर्षीय व्यक्तीने मद्यपान केले. त्यानंतर त्याने एका पुरुष केबिन क्रूला दारूच्या नशेत जबरदस्ती केली आणि त्याचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. डेव्हिड अॅलन बर्क असे या चुंबनबहाद्दराचे नाव आहे. बर्क १० एप्रिल रोजी मिनेसोटाहून अलास्काला जात होता. तो बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होता. या क्लासमधील प्रवासी असल्याने त्याने मद्याची मागणी केली. या क्लासमधील कोणत्याही प्रवाशाला दारू पिण्यास परवानगी असते. तथापि, विमानाचे स्वतःचे काही नियम होते, ज्यामुळे त्याला जास्त दारू पिण्याची परवानगी देण्यात आली नाही.
बर्कचे वय लक्षात घेता कर्मचाऱ्यांनी विमान प्रवासादरम्यान त्याला जास्त दारू पिण्यास मनाई केली. ज्यामुळे बर्क संतापला. त्याची समजूत घालून त्याला शांत बसवण्यात आले. त्यानंतर विमानातील पुरुष कर्मचारी (केबिन क्रू) त्याच्याकडे काही हवे का ते विचारण्यासाठी आला, त्यावेळी बर्कने त्याच्यासोबत गैरवर्तन केले. कर्मचारी काही हवे आहे का हे विचारण्यासाठी आल्यावर बर्क विमानाच्या मधल्या मोकळ्या जागेत उभा राहिला आणि त्याने त्या कर्मचाऱ्याला थांबायला सांगितले. डेव्हिड बर्कने त्याचे जबरदस्तीने चुंबन घेतले. चुंबन घेण्यापूर्वी त्या कर्मचाऱ्याचे कौतुक देखील केले.
डेव्हिड बर्क त्याला म्हणाला 'तू खूप सुंदर आहेस' मला तुझे एक चुंबन घेऊ दे. त्यावर कर्मचाऱ्याने त्याला नकार दिला. त्यानंतर डेव्हिड अॅलन बर्कने केबिन क्रूला पकडले, त्याला आपल्याकडे खेचले आणि त्याच्या मानेवर चुंबन घेतले. चुंबन घेताना डेव्हिड बर्कने ट्रेमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थही खराब केले. या घटनेनंतर फ्लाईट अटेंडंट केबिन क्रू रूममध्ये गेला. विमान अलास्का विमानतळावर उतरल्यानंतर वैमानिकाने विमानात घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर एफबीआयचे अधिकारी आरोपीची चौकशी करण्यासाठी दाखल झाले. चौकशीदरम्यान बर्कने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यास नकार दिला. मात्र, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रवासी डेव्हिड बर्क याच्यावर प्राणघातक हल्ला आणि गुन्हेगारी गैरवर्तनाच्या आरोपाखाली २७ एप्रिल रोजी न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.
वृत्तसंस्था