महापालिकेने थकवले सव्वा कोटीचे वीजबिल
विकास शिंदे
वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती खडतर झाली आहे. त्यातच काही विभागाच्या सरकारी कार्यालयांकडे वीज बिलांची थकबाकी वाढली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ८४० कार्यालयांकडे १ कोटी ११ लाख रुपये विज बिलांची थकबाकी बाकी आहे. ही विल बिलांची थकबाकी आपण तात्काळ भरुन सहकार्य करावे, अशी विनंतीवजा पत्र महावितरणने पालिकेच्या विद्युत विभागाकडे पाठवले आहे.
पुणे महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, तसेच काही पश्चिम महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांना वीज बिलांच्या थकबाकीची रक्कम तातडीने भरण्याबाबत कार्यवाही करावी, अशी विनंती करणारे पत्र पाठवले आहे. या पत्रासोबतच संबंधित थकबाकीदार कार्यालयांची यादी देखील जोडण्यात आली आहे. महावितरण कंपनीकडे काही महिन्यांपासून घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडून मासिक वीजबिलांचा भरणा होत नसल्याने थकबाकीमध्ये वाढ होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १७ लाख ८५ हजार वीज ग्राहकांकडे ३३२ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी आहे.
ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरु केली आहे. तसेच वीज बिलांची सर्वाधिक थकबाकी असलेल्या सरकारी कार्यालयांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यालयांकडे देखील थकबाकी भरण्यासाठी महावितरणकडून पाठपुरावा सुरू केला आहे. थकीत रकमेचा भरणा झाला नाही तर प्रसंगी वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात येत आहे.
वीजबिल भरण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयांच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद केली जाते. त्याप्रमाणे संबंधित खात्याकडून निधी उपलब्ध होतो. मात्र पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, काही पोलीस विभागाच्या विविध कार्यालयांकडून वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने थकबाकी वाढत असल्याची स्थिती आहे.यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १३९२ कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी १ कोटी ७३ लाख ५० हजार रुपये झाली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या विद्युत विभागाकडे महावितरणने पाठविलेले पत्र अद्याप मिळालेले नाही. महापालिकेचे प्रत्येक कार्यालय, त्यांची विज बिलांची थकबाकी असलेली लिस्ट दिलेली असते. ते पत्र आयुक्त कार्यालयाकडील टपालात गेले असेल कदाचित, त्यामुळे अजून आम्हाला मिळालेले नाही. महावितरणने पाठविलेले थकबाकीची लिस्ट तपासून जी काही थकबाकी असेल ती तात्काळ भरण्यात येईल, अशी माहिती सह शहर अभियंता बाळासाहेब गलबले यांनी दिली.
कोणाकडे किती थकबाकी?
पुणे जिल्ह्यात ४ हजार ३४८ सरकारी कार्यालयांकडे ८ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या ५५२ कार्यालयांकडे ६३ लाख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ८४० कार्यालयांकडे १ कोटी ११ लाख, पुणे जिल्हा परिषदेच्या १९१३ कार्यालयांकडे ५ कोटी ५८ लाख तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या १०४३ कार्यालयांकडे १ कोटी २५ लाख रुपये थकीत आहे.