टायटॅनिकवरील मेन्यूकार्ड अजूनही चर्चेत
#लॉस एंजेलिस
टायटॅनिक हा आपल्यापैकी बहुतांश जणांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. १५ एप्रिल १९१२ रोजी हे महाकाय जहाज हिमनगावर आदळून उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले होते. जेम्स कॅमेरून यांच्या ‘टायटॅनिक’ या चित्रपटातून या जहाजाची दुर्दैवी कहाणी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. या घटनेला आता १११ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, या जहाजाबद्दल आजही लोकांना तेवढीच उत्सुकता आणि कुतूहल आहे. अशातच आता या जहाजावर दिल्या गेलेल्या खाद्यपदार्थांचे एक मेन्यूकार्ड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. केवळ जहाजच नव्हे तर जहाजावरील खाद्यपदार्थांबाबतही सर्वसामान्यांमच्या मनातले कुतूहल कायम असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
सोशल मीडिया साईट इंस्टाग्रामवर ‘टेस्टअॅटलास’ या खात्यावरून टायटॅनिक संबंधी एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये टायटॅनिकवर दिल्या गेलेल्या खाद्यपदार्थांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, टायटॅनिक जहाजावर चिकन करी, बेक्ड फिश, स्प्रिंग लॅम्ब, रोस्ट टर्की असे पदार्थ प्रवाशांना देण्यात आले. विशेष म्हणजे ज्या रात्री टायटनिकचा अपघात झाला त्या रात्री प्रवाशांना रात्रीच्या जेवणात प्लम पुडींग म्हणजेच ख्रिसमस पुडींग हा गोड पदार्थ देण्यात आला होता.
प्रत्येक श्रेणीसाठी स्वतंत्र मेन्यूकार्ड
टायटॅनिकवर प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणींच्या प्रवाशांसाठी तीन वेगळे मेन्यूकार्ड होते. प्रथम श्रेणीच्या प्रवाशांसाठी एग्ज्स आर्जेंट्यूल चिकन मेरिलॅंड, व्हेजीटेबल डम्पलिंग्स, कॉर्न्ड बीफ, ग्रिल्ड मटन चॉप्स, सॅमन मेयोनिज या सारख्या पदार्थांची मेजवानी होती. तर द्वितीय श्रेणी प्रवाशांसाठी असलेल्या मेन्यूकार्डमध्ये रोल्ड ओट्स, फ्रेश फिश आणि अमेरिकन ड्राय हॅश यासारख्या पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच तृतीत श्रेणी प्रवाशांसाठी ओटमिल पॉरिज, जॅकेट पोटॅटो, फ्रेश ब्रेड, ब्राऊन ग्रेव्ही, असे पदार्थ होते. खाद्यपदार्थांशिवाय या जहाजामधील भोजन कक्षाचे काही फोटोही या खात्यावरून शेअर करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक श्रेणीच्या प्रवाशांसाठी तीन वेगळ्या प्रकारचे भोजन कक्ष असल्याचे दिसून येते.
वृत्तसंस्था