पाटण्यातील बैठक तूर्त लांबणीवर
#नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होत असून त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांच्या एकीसाठी धोरण ठरवण्याकरिता येत्या १२ जूनला पाटण्यात बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलली असून ती आता २३ जून रोजी होण्याची शक्यता आहे.
या बाबतची माहिती नितीशकुमार यांनी दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असल्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याऐवजी पक्षाचे अन्य नेते बैठकीत राहतील असे काँग्रेसने सांगितले. दुसरीकडे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. जे. स्टॅलिन यांच्या ऐवजी द्रमुकच्या प्रतिनिधींना पाठविण्यात येईल, असा संदेश दिला गेला. मात्र, यामुळे बैठकीचे गांभीर्य कमी होण्याची शक्यता होती. मात्र, आता बैठक पुढे ढकलल्याने पक्षाचे महत्त्वाचे नेते हजर राहतील, अशी अपेक्षा आहे.
बिगर भाजप पक्षांची मोट बांधणारे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांच्या संयुक्त बैठकीत पक्षाचे आघाडीचे नेते सामील व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. कारण संयुक्त बैठकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेते सहभागी झाल्यास या बैठकीचे गांभीर्य कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
परिणामी याचा लाभ भाजपला मिळेल. त्याचवेळी या बैठकीत बडे नेते सहभागी झाले तर विरोधकांच्या भूमिकेला लवकर आकार मिळेल, असे नितीशकुमार यांना वाटते. आता नव्या बदलानुसार ही बैठक २३ जून रोजी होऊ शकते, असा अंदाज आहे. नितीशकुमार यांनी बिगर भाजप नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी पश्चिम बंगाल, दिल्ली, ओडिशा, झारखंड यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत.
वृत्तसंस्था