फ्रान्सच्या राष्ट्रपतींची कमाल!
#पॅरिस
सोशल मीडियावर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राॅन यांनी अवघ्या १७ सेकंदात एका झटक्यात बियर बाॅटल रिचवल्याचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. या व्हीडीओला मोठ्या प्रमाणात लाईक केले जात असून दुसरीकडे हा व्हीडीओ पाहून विरोधकांनी मात्र मॅक्राॅन यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हीडीओ व्हायरल होत असतो. या ना त्या कारणामुळे व्हीडीओला प्रसिद्धी मिळत असते. यावेळी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राॅन यांचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हीडीओत फ्रान्सचे राष्ट्रपती एका झटक्यात १७ सेकंदांमध्ये बियरची बाॅटल रिचवताना दिसत आहेत. त्यांची ही कृती पाहून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
इमॅन्युएल मॅक्राॅन टुलूज रग्बी खेळाडूंसोबत त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते. रग्बी स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर खेळाडूंसोबत त्यांनी जल्लोष केला. तसेच आनंदाच्या भरात एका झटक्यात बियर रिचवली. या व्हायरल व्हीडीओमुळे मॅक्राॅन वादात अडकू शकतात. दारू पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आता त्यांच्यावर होत आहे.
विजयी जल्लोष करणाऱ्या खेळाडूंची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती मॅक्राॅन आल्यानंतर तिथे त्यांना कोरोना बियरची बाटली दिली गेली. हातात बियर दिल्यानंतर उत्साहाच्या भरात मॅक्राॅन यांनी एका दमात बियरची बाटली रिती केली. ही बॉटल रिकामी करण्यासाठी त्यांना फक्त १७ सेंकदाचा अवधी लागला. त्यांच्या या कृतीनंतर उपस्थित खेळाडूंनी एकच जल्लोष केला. हा व्हीडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हीडीओनंतर विरोधकांनी राष्ट्रपती मॅक्राॅन यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘‘राष्ट्रपती हे मोठं पद असून त्या पदाची लाज राखणं गरजेचं आहे,’’ अशी टीका विरोधकांनी केली आहे. ग्रीन्स पार्टीचे खासदार सँड्रिन रुसो यांनीही ट्वीट करून निशाणा साधला. ‘‘राजकीय नेतृत्व आणि विषारी मर्दानगी एकाच फोटोत,’’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
सोशल मीडियावर या व्हीडीओखाली कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मॅक्राॅन यांच्या या कृतीला जगभरातील युवावर्गाने लाईक-शेअरच्या माध्यमातून आपली पसंती दर्शवली. त्याचबरोबर अनेकांनी राष्ट्रपतींच्या या कृतीचा निषेध केला. एका यूजर्सने लिहिलं, “राष्ट्रपतिपदावर असलेल्या एका व्यक्तीने खुलेआमपणे दारू पिणे योग्य नाही. यामुळे चुकीचा संदेश जातो.” दुसऱ्या यूजर्सने लिहिलं आहे की, “अशा कृतीमुळे देशाचं नाव बदनाम होतं. त्यामुळे राष्ट्रपतींनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा.”
वृत्तसंस्था