वऱ्हाडी आले, जेवले अन् गेले सुद्धा
#बीजिंग
अलीकडे विवाह समारंभातील पंगतीपेक्षा विवाहानंतर आपल्या सोईने रिसेप्शन देण्याची पद्धत लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा ज्यांना लग्नाच्या दिवशी हजर राहणे शक्य नसते असे पाहुणे या स्वागत समारंभाला हजर राहतात, वधूवराला आशीर्वाद देतात आणि भोजनाचा आनंद घेऊ शकतात. त्यासाठी अशा स्वागत समारंभात नवविवाहित दाम्पत्य हजर असणे गरजेचे असते. नुकताच एक स्वागत समारंभ नवविवाहित दाम्पत्याच्या गैरहजेरीत पार पाडला आहे. नवरा-नवरी हजर नसताना का समारंभ कसा काय पार पडला असेल अशी शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
हा प्रकार भारतात नव्हे तर चीनमध्ये घडला आहे. हेनान प्रांतात नवरीच्या आईवडिलांनी हा स्वागत समारंभ आयोजित केला होता. पण या समारंभाला नारा-नवरी हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पार पडला. कारण शेवटी चीन असो की भारत, पाहुणे मंडळी जेवायलाच येत असतात. आपल्याकडे म्हण आहे ना नवरी येते नवऱ्यासाठी अन वऱ्हाडी येतात जेवणासाठी. तसाच काहीसा प्रकार इथे घडला. सोशल मीडियावर ही बातमी सध्या झळकते आहे.
कुठे गेले नवरा-नवरी ?
वधुपित्याने स्वागत समारंभात खूप पाहुणे बोलवले. पाहुणे मोठ्या संख्येने आलेसुद्धा. मात्र बराच वेळ झाला तरी या पाहुण्यांना नवविवाहित जोडपेच दिसले नाही. त्यांनी चौकशी केली. त्यावेळे नवरा-नवरी या समारंभाला पोहचू शकत नसल्याचे समजले. त्यातून वधूपित्याने एक मार्ग शोधला. त्यांनी विवाह समारंभाचा एक व्हीडीओ मोठ्या स्क्रीनवर लावला आणि १५ मिनिटांचे भाषण दिले. भाषणानंतर त्यांनी सगळ्या पाहुण्यांना जेवल्याशिवाय जायचे नाही, असा आग्रह केला. शेवटी पाहुणे आलेच होते जेवणासाठी. मग सगळ्या पाहुण्यांनी खुशाल छान-छान पदार्थांवर ताव मारला आणि वधूवरांना आशीर्वाद देत सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले.
वृत्तसंस्था