सोन्याचा कंटेनर केला गायब
#टोरंटो
आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची जबरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सोन्याने भरलेला एक मोठा कंटेनर गायब झाला आहे. या कंटेनरमध्ये तब्बल १ अब्ज २३ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने होते. त्यामुळे किमती सोने चोरट्यांनी एवढ्या कमी वेळेत कसे लांबवले, असा प्रश्न विमानतळ सुरक्षा अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना पडला आहे.
या प्रकरणाबाबत तपास अधिकारी आणि पोलीस आयुक्त स्टीफन ड्युवेस्टिनने सांगितले की, कार्गोमध्ये सोने आले होते. परंतु ते टर्मिनलमधूनच गायब झाले. अनलोडिंगच्या वेळी ही घटना उघडकीस आली आहे. ही घटना कॅनडातील टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे. १७ एप्रिल रोजी पिअर्सन विमानतळावर सोन्याने भरलेला कंटेनर आला होता. मात्र, जेव्हा तो उतरवायची वेळ आली तेव्हा कळालं की तो कंटेनरच गायब झालेला होता.
स्टीफन म्हणाले की, कंटेनर विमानतळावर येईपर्यंत दिसत होता. मात्र, जेव्हा विमानातून सामान उतरवण्यात आला तेव्हा तो अचानक बेपत्ता झाल्याचे कळले. ते कधी आणि कोणी गायब केले हे अद्याप कळू शकलेले नाही. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे. हे सोने कोठून आले आणि ते कुठे जात होते, याबाबत अधिकाऱ्यांनी काहीही माहिती दिली नाही. हे सोने उत्तर ओंटारियोमधील एका खाणीतून टोरंटोला बँकांसाठी पाठवले गेले असावे. या चोरीमागे गुन्हेगारी टोळ्यांचा हात असू शकतो. चोरीची अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती. मात्र, या घटनेकडे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहू नये, असे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
वृत्तसंस्था