कुटुंब भाड्याने देण्याचा व्यवसाय बहरला

जपानचा उल्लेख विकसित अर्थव्यवस्था असा केला जातो, प्रत्यक्षात जपानमधील कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्याचा फायदा उचलत व्यावसायिक कंपन्यांनी आता कुटुंब भाडेतत्त्वावर द्यायला सुरुवात केली आहे. हा व्यवसाय इतका वाढीस लागला आहे की जपानमध्ये आता आई-वडील, भाऊ-बहीण, प्रेयसी भाड्याने मिळू लागले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 6 Jun 2023
  • 08:39 am
कुटुंब भाड्याने देण्याचा व्यवसाय बहरला

कुटुंब भाड्याने देण्याचा व्यवसाय बहरला

आई-वडील, भाऊ-बहीणच काय पण मित्र-मैत्रिणीही मिळतात भाड्याने

#टोकियो

जपानचा उल्लेख विकसित अर्थव्यवस्था असा केला जातो, प्रत्यक्षात जपानमधील कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्याचा फायदा उचलत व्यावसायिक कंपन्यांनी आता कुटुंब भाडेतत्त्वावर  द्यायला सुरुवात केली आहे. हा व्यवसाय इतका वाढीस लागला आहे की जपानमध्ये आता आई-वडील, भाऊ-बहीण, प्रेयसी भाड्याने मिळू लागले आहेत.  

जपानमध्ये एकट्याने जगण्याचा ट्रेंड सुरू आहे. एका अभ्यासानुसार, येत्या पाच वर्षांत जपानमध्ये एकट्याने वास्तव्य करणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.  कुटुंबासोबत राहण्यापेक्षा एकाकी आयुष्य जगण्याची पद्धत रुजल्याने जपानमध्ये कुटुंबव्यवस्थाच शिल्लक राहिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विवाह न करता एकट्याने जगणे, कुटुंबासोबत न राहता एकट्याने वास्तव्य करणे या प्रकारातून जपानच्या लोकसंख्येवरही दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. इथे तुम्हाला गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंड भाड्याने मिळू शकतो. तसेच आता कुटुंबही भाड्याने मिळण्याची व्यवस्था झाली आहे. या संधीचा लाभ घेत व्यावसायिक संस्थांनी कुटुंब भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

का राहतात जपानी लोक एकाकी?

जपानमध्ये कुटुंब, विवाह अशा गोष्टींना प्राधान्य देण्यापेक्षा काम करण्याला, संपत्ती गोळा करण्याला प्राधान्य दिले जाते. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था मोडकळीस आल्याने युवती-युवक सतत कामात मग्न असतात. भरपूर पैसे मिळवायचे आणि चैनीत राहायचे, असा हा ट्रेंड आहे. त्यामुळे इथे लोक भरपूर काम करतात, पैसे मिळवतात आणि त्या पैशांच्या जोरावर भौतिक संसाधनांचा मनसोक्त उपभोग घेतात, पण या सगळ्या भानगडीत ते एकाकी पडत जातात. अशा एकाकी लोकांची संख्या वाढल्याने भाडेतत्त्वावर कुटुंब अथवा मित्र मिळवून देण्याचा व्यवसाय बहरला आहे.

कसे आहे दरपत्रक?

स्वतःच्या कुटुंबापासून दुरावलेल्या या युवकांकडे, युवतींकडे पैसे भरपूर असतात. त्यामुळे भाड्याने कुटुंब मिळवायचे असेल तर त्यासाठी थोडे अधिकचे पैसे मोजावे लागतात. संपूर्ण कुटुंब काही तासांसाठी भाड्याने घ्यायचे असेल तर १ हजार डॉलर मोजावे लागतात. केवळ एकच सदस्य भाड्याने मागवायचा असेल तर २०० डॉलर द्यावे लागतात. जपानमध्ये भाड्याने मिळणारा कुटुंबातील सर्वात महागडा सदस्य म्हणजे बहीण. भाड्याने बहीण हवी असेल तर १ हजार डॉलर मोजावे लागतात. विशेष म्हणजे हा व्यवसाय भरभराटीला आला असून आठवड्यातून एक दिवस काही तासांसाठी असे कुटुंब भाड्याने घेतले जात आहे.    

अशी असते कंपन्यांची कार्यपद्धती

भाड्याने मागवणाऱ्यांसाठी कंपन्या पर्याय उपलब्ध करून देतात. तुम्हाला कोणते कुटुंब मागवायचे आहे, याचे पर्याय उपलब्ध करून दिले जातात. सुरुवातीला ए मेलवर आणि नंतर फोनवर बोलणे करून दिले जाते आणि नंतर आगाऊ रक्कम भरल्यावर संबंधित कुटुंब अथवा एखादा सदस्य तुमच्याशी गप्पा मारायला घरी पाठवला जातो. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest