संग्रहित छायाचित्र
लंडन : भारतीय वंशाचे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या हुजूर पक्षाचा ४ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत पराभव होणे अटळ असल्याचे संकेत आहेत. या निवडणुकीपूर्वीच्या सर्वेक्षणात हुजूर पक्षाचा सफाया होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. ‘द इकॉनॉमिस्ट’च्या सर्व्हेत सुनक यांना सर्वाधिक ११७ जागा मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांना ४२५ वर जागा मिळतील असा अंदाज आहे. अन्य एका सर्व्हेनुसार हुजूर पक्षाला केवळ ५३ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
पंतप्रधान सुनक यांचा पक्ष जेव्हा लोकप्रियतेच्या बाबतीत विरोधी मजूर पक्षापेक्षा २० अंक मागे होता तर मुदतपूर्व निवडणूक घेण्याची काय गरज होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुनक यांच्याकडे निवडणूक घेण्यासाठी ६ महिन्यांपेक्षा जास्त अवधी होता. हा काळ लोकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी पुरेसा होता, असे मानले जाते.
विरोधी पक्षनेते कीर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाने आम्ही सत्तेत आल्यास भारतासोबत मोफत व्यापार करार करू अशी घोषणा केली आहे. मजूर पक्षाचे खासदार आणि शॅडो विदेशमंत्री डेव्हिड लॅमी यांनी सांगितले की, सत्तेत आल्यानंतर भारतासोबत मोफत व्यापार करारावर (एफटीए) आम्ही प्राधान्याने काम करू. सुनक २०२० मध्ये सत्तेत आले. त्यानंतर अनेक वेळा व्यापार कराराची चर्चा झाली. मात्र हुजूर पक्षाने भारतासोबत व्यापार करारावर स्वाक्षरी केली नाही. याआधी सुनक सरकारने ग्रॅज्युएशन व्हिसा रूट बंद करण्याची तयारी केली होती. त्यावेळी स्टार्मर यांनी विरोध केला होता. त्यामुळे सुनक यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला.
नेतृत्व बदलाची चर्चा
निवडणुकीनंतर हुजूर पक्षात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. हुजूर पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी लाॅबिंग सुरू केले आहे. ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि लेबर पार्टीचे नेते केयर स्टार्मर यांच्यात एक महत्त्वाची चर्चा टीव्हीवर झाली. चर्चेदरम्यान बराच गदारोळ झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक हल्लेही केले.
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात, ऋषी सुनक स्टार्मरपेक्षा २० गुणांनी पिछाडीवर आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाच्या उमेदवारावर विजय मिळवण्याची शेवटची संधी पंतप्रधानांकडे होती. एका अहवालानुसार वादात सुनक आपल्या विरोधी नेत्यावर वर्चस्व गाजवताना दिसले. ७५ मिनिटांच्या चर्चेत सुनक यांनी स्टार्मर यांना जेरीस आणले. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांच्यापेक्षा चांगला पर्याय नाही, असे सुनक यांनी भाषणात सांगितले. विरोधी पक्षनेते स्टार्मर केवळ बदलाविषयी बोलतात. त्यासाठी कोणतीही योजना नसल्याचा आरोप सुनक यांनी केला. ते म्हणाले, केवळ बदलाच्या गप्पा मारून परिवर्तन होत नाही. ते कर, कल्याण कमी करतील. त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळेल आणि त्यांची बचत होईल.
इमिग्रेशन, टॅक्स, महिलांचे हक्क या मुद्द्यांवर देशासोबत उभे राहण्याची गरज असल्याचे सुनक म्हणाले. लेबर पार्टीला शरण जाऊ नये असे आवाहन त्यांनी जनतेला केले. वादविवादात स्टार्मर यांनी सुनक यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान इतके श्रीमंत आहेत की त्यांना सामान्य ब्रिटिशांच्या समस्या समजत नाहीत. ब्रिटनमध्ये बेकायदेशीर स्थलांतर ही मोठी समस्या आहे. स्थलांतरितांना त्यांच्या देशात (इराण, सीरिया, अफगाणिस्तान) परत पाठवण्याची गरज आहे. या वक्तव्यावर सुनक यांनी लगेच त्यांना घेरले. सुनक म्हणाले, स्टार्मर इराणमध्ये खामेनी यांच्याशी भेटणार आहेत का? ते यासंबंधी तालिबानशी करार करू शकतील का? हा फक्त मूर्खपणा आहे. तुम्ही लोकांना मूर्ख समजणे बंद करा. त्यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर जुलैमध्येच बेकायदेशीर स्थलांतरितांची रवांडात हद्दपारी सुरू होईल. लेबर पार्टीला मतदान करून नागरिकांनी देशाची सुरक्षा गहाण ठेऊ नये. स्टार्मर म्हणाले की, सुनक यांची रवांडा योजना सुरू झाली तरी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर पाठवण्यास ३०० वर्षे लागतील.