कर्ज देऊन ड्रॅगन वाढवतोय प्रभाव
#वॉशिंग्टन
पाकिस्तान, श्रीलंका आणि मालदिवसारख्या भारताच्या शेजारील देशांना कर्जपुरवठा करत चीन त्यांचा गैरवापर करू शकतो, अशी चिंता व्यक्त करत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डोनाल्ड लू यांनी भारताला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. चीन पूर्वीपासून पाकिस्तानला मदत करत त्यांचा वापर बफर स्टेटसारखा करत आले आहे. पाकिस्तानसोबतच श्रीलंका, मालदीव या भारताच्या शेजारील देशांना भरपूर कर्ज पुरवठा करणारा चीन त्यांच्या धोरणावरही प्रभाव टाकू शकतो, असे लू म्हणाले आहेत.
अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री ( दक्षिण आणि मध्य आशिया) अँटोनी ब्लिंकन लवकरच भारतात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड लू यांनी हे विधान केले आहे. ब्लिंकन मार्च महिन्यात तीन दिवसांसाठी भारत भेटीवर येणार आहेत. भारताच्या शेजारील देशांना कर्ज देऊन मिंधे करून ठेवायचे आणि नंतर त्यांच्या धोरणात्मक निर्णयात ढवळाढवळ करायची संधी चीन साधू शकतो. या देशांनी स्वतःच्या धोरणात्मक निर्णयात इतर कुठल्या शक्तींचा हस्तक्षेप मान्य करू नये, यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. आम्ही या देशांशी आणि भारताशीही या विषयावर चर्चा करणार असल्याचे लू म्हणाले आहेत.
वृत्तसंंस्था