बंगा यांच्यासमोर हवामान बदलाचे आव्हान
#न्यूयॉर्क
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची निवड करण्यात आली. हे पद भूषविणारे ते पहिले आशियायी वंशाचे व्यक्ती आहेत. बंगा यांची नियुक्ती आशियायी देशांसाठी अभिमानाची बाब असली तरीही बंगा यांच्यासमोरील आव्हानेही गंभीर आहेत. जागतिक अर्थकारणाला शिस्त लावण्यासोबतच जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे अर्थकारणावर होणाऱ्या दुष्परिणामांचाही विचार त्यांना करावा लागणार आहे.
डेव्हिड मालपास यांनी राजीनामा जाहीर केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी फेब्रुवारीमध्ये अजय बंगा यांना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केले. तेव्हापासून अजय बंगा यांचे जागतिक बँकेचे अध्यक्ष होणे जवळपास निश्चित मानले जात होते. या पदासाठी अन्य कुणी उमेदवारी घोषित केली नाही त्यांना नामनिर्देशित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही बंगा यांच्यासमोर हवामान बदलासारखे आव्हान असल्याचा उल्लेख केला होता.
येत्या २ जून २०२३ रोजी बंगा त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असेल. विशेष म्हणजे अजय बंगा यांची २५ सदस्यीय कार्यकारी मंडळाने बिनविरोध निवड केली. याआधी बंगा हे मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आहेत. त्यांना आर्थिक आणि विकास कामांचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी, जागतिक बँकेचे पाय उतार झालेले अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी वर्षाच्या सुरुवातीला हे पद सोडण्याची घोषणा केली होती.
अजय बंगा यांचे भारताशी आहे विशेष नाते
अजय बंगा यांचा जन्म १० नोव्हेंबर १९५९ रोजी पुणे (महाराष्ट्र) येथे झाला. त्यांचे वडील हरभजन सिंग बंगा हे भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल होते. त्यांचे कुटुंब मूळचे पंजाबमधील जालंधरचे आहे. बंगा यांना २००७ मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळाले. त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले. त्यांनी १९८० मध्ये नेस्ले इंडियामधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी या कंपनीत १३ वर्षे योगदान दिले. व्यवस्थापन ते विक्री विभागापर्यंत काम केले. भारतात पेप्सिको इंटरनॅशनल रेस्टॉरंट चेन उघडण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांनी १० वर्षांहून अधिक काळ मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणून काम केले. यासोबतच अमेरिकन रेडक्रॉस, क्राफ्ट फूड यांसारख्या अनेक कंपन्यांच्या सल्लागार मंडळातही त्यांचा सहभाग आहे. ते जनरल ॲटलांटिक या प्रायव्हेट इक्विटी फर्मचे उपाध्यक्षही राहिले आहेत. अजय बंगा यांची एकूण संपत्ती सुमारे १७०० कोटी रुपये एवढी आहे. दरम्यान आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २०१६ मध्ये अजय बंगा यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. ते २ जून २०२३ रोजी जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांच्यासमोर अनेक नवी आव्हाने आहेत.
वृत्तसंस्था