महिला अधिकारावर चर्चा, पण बुरखा घालून
#काबूल
जगभर आठ मार्चला महिला दिन साजरा होत असताना तालिबानची राजवट असलेल्या अफगाणिस्तानमध्येही हा दिवस साजरा करण्यात आला. अफगाणिस्तानातील टोलो या सगळ्यात मोठ्या खासगी चॅनेलवर महिला अधिकारावर चर्चा झाली. या कार्यक्रमात चार महिला सहभागी झाल्या होत्या. मात्र, त्यांनी पूर्ण बुरखा घातला होता, तसेच शस्त्रक्रियेवेळी वापरला जाणारा मास्कही घातला होता.
विशेष म्हणजे हा कार्यक्रम तालिबान सरकारनेच आयोजित केला होता. १५ ऑगस्ट २०२१ ला अफगाणिस्तानात तालिबान राजवट सत्तेवर आली. त्यानंतर प्रथमच महिलांना टीव्हीवर येण्याची परवानगी देण्यात आली. या विशेष चर्चा कार्यक्रमात भाग घेतलेल्या चार महिलांपैकी एक अँकर आणि बाकीच्या तीनजणी सहभागी सदस्या होत्या. चॅनेलने या विषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्लाममध्येही चर्चा होऊ शकते, हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या चर्चेचे आयोजन केले होते. चर्चेसाठी विशेष ड्रेस कोड होता. साऱ्याजणींना पूर्ण बुरखा घालण्याचे आणि शस्त्रक्रियेवेळी वापरला जाणारा मास्क वापरण्यास सांगितले होते. प्रसारणात आपले केस दिसणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले होते. चर्चेत सहभागी झालेल्या पत्रकार अस्मा खोग्यानी म्हणाल्या की, इस्लाममध्ये महिलांना अधिकार दिले आहेत. त्यांना शिक्षण आणि काम करण्याची परवानगी आहे.
विद्यापीठात प्रोफेसर असलेल्या जाकिरा नबील यांनीही चर्चेत भाग घेताना त्या म्हणाल्या की, इस्लाममध्ये महिलांना शिक्षणाचा आणि कामाचा हक्क दिलेला आहे. कोणाला आवडो अथवा न आवडो महिला समाजाचा एक अविभाज्य भाग आहे, ही बाब नाकारता येणार नाही. शाळा अथवा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. मात्र, अशा स्थितीत त्या घरातूनही शिक्षण घेऊ शकतात. वृत्तसंंस्था