सरकारविरोधी भूमिका घेणे महागात
#मॉस्को
सरकारविरोधी भूमिका घेणे बेलारूसचे नोबेल पुरस्कारविजेते व मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की यांना महागात पडले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक न्यायालयाने बिलियात्स्की यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
सरकारविरोधातील आंदोलनांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये मानवी हक्कांचा प्रचार करण्यासाठी अॅलेस यांना नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आले होते. अॅलेस यांच्या समर्थकांच्या मते, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांचे सरकार त्यांना जबरदस्तीने गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे. ६० वर्षीय अलेस बिलियात्स्की यांना सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, आंदोलकांना निधी देणे यासाठी ही शिक्षा सुनावण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेत्याशिवाय आणखी तीनजणांना सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी निधी दिल्याबद्दल शिक्षा झाली. २०२० मध्ये झालेल्या निदर्शनांनंतर सरकारने चौघांना अटक केली होती. हे सर्वजण बेलारूसचे अध्यक्ष म्हणून अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या निवडीला विरोध करत होते.
कारवाई राजकीय आकसापोटीच ...
अलेस यांच्याविरुद्ध ही कारवाई राजकीय सुडातून केल्याचा आरोप मानवाधिकार संघटनेने केला आहे. त्याच वेळी, निर्वासित बेलारशियन विरोधी पक्षनेत्या स्वेतलाना सिखानौस्काया यांनी अलेस यांचे समर्थन केले आहे. सर्वांना चुकीच्या पद्धतीने दोषी ठरवण्यात आले आहे. हा निकाल धक्कादायक आहे. सरकारी वकिलांनी मिन्स्क कोर्टाला बिलियात्स्की यांना १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यास सांगितले होते. परंतु न्यायालयाने हा आरोप लक्षात घेऊन त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच त्यांना ६५ हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. वेस्ना मानवाधिकार केंद्राचे प्रमुख अॅलेस बिलियात्स्की आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर विरोधी निदर्शने, मनी लाँड्रिंगला वित्तपुरवठा केल्याचा आरोप आहे. बिलियात्स्की यांना ऑगस्ट २०११ मध्ये ताब्यात घेण्यात आले.