Country on lease : आमचा देश भाडेतत्वावर चालवायला घ्या

पाकिस्तान सध्या विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. आर्थिक चणचण भागवण्यासाठी पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे विनंती करूनही कर्ज मंजूर झालेले नाही. पैसे नसल्याने सरकार दोन प्रांतांच्या निवडणुकाही घेऊ शकत नसल्याचे समोर आले आहे. या अवस्थेत पाकिस्तानमधील एक उद्योगपती आणि ब्लॉगरने केलेला व्हीडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 26 Apr 2023
  • 01:24 pm
आमचा देश भाडेतत्वावर चालवायला घ्या

आमचा देश भाडेतत्वावर चालवायला घ्या

#इस्लामाबाद

पाकिस्तान सध्या विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. आर्थिक चणचण भागवण्यासाठी पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे विनंती करूनही कर्ज मंजूर  झालेले नाही. पैसे नसल्याने सरकार दोन प्रांतांच्या निवडणुकाही घेऊ शकत नसल्याचे समोर आले आहे. या अवस्थेत पाकिस्तानमधील एक उद्योगपती आणि ब्लॉगरने केलेला व्हीडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. तारिक भट या उद्योगपतीने पाकिस्तानची दुरवस्था लक्षात घेत तो लीजवर घेण्याचे आवाहन भारताला केले आहे. भारताची दमदार वाटचाल लक्षात घेता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान भाडेतत्त्वावर चालवायला घ्यावा असे त्याचे म्हणणे आहे.  

तारिक भट या ट्विटर अकाऊंटवरून या पाकिस्तानी ब्लॉगरचा व्हीडीओ शेअर करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरपेक्षा भारतीय हद्दीतील काश्मीर हे नशीबवान असल्याची भावना या व्हीडीओत व्यक्त करण्यात आली आहे. या व्हीडीओच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅगदेखील करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये सातत्याने काश्मीरच्या  मुद्द्यावरून वाद होत असतात. पाकव्याप्त काश्मीरबद्दल जागतिक पातळीवर चर्चा होत असते, पण प्रत्यक्षात एका पाकिस्तानी उद्योगपतीने केवळ व्याप्त काश्मीरच नव्हे संपूर्ण पाकिस्तान लीजवर घ्यावा, असे आवाहन केल्यामुळे या व्हीडीओची विशेष चर्चा होत आहे.

काय म्हणाले आहेत तारिक भट?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फरक स्पष्ट आहे. पाकिस्तानच्या लोकांना गव्हाच्या पिठासाठी गर्दी करावी लागत आहे. याउलट जगातील सगळे प्रगत देश भारताशी मैत्री करण्यासाठी उत्सुक आहेत. काश्मीर हे अशा देशात आहे, जो देश लवकरच जगावर प्रभुत्व गाजवेल. अमेरिकेला भारतासोबत सहकार्य गरजेचे वाटते. इंग्लंडला भारतासोबत मैत्री वाढवावी वाटते. व्यापार, आयटी क्षेत्र, विज्ञान-तंत्रज्ञान, औषधनिर्मिती अशा सगळ्याच क्षेत्रात भारत सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळेच जगभरातील देश भारतासोबत मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी धडपडत आहेत. या तुलनेत आम्ही कुठे आहोत, आमची अवस्था काय झाली आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आमचा देश अजूनही बिर्याणी अधिक चविष्ट कशी बनवता येईल, यात मग्न आहे. कबाबची चव कशाने वाढेल, याचा विचार करण्यात आम्ही गुंतलो आहोत. या पलीकडे आमची मजल गेली नाही. म्हणूनच माझे भारताच्या पंतप्रधानांना आव्हान आहे, त्यांनी आम्हाला दत्तक घ्यावे. भारताचा पासपोर्ट पाहा, त्यांची अर्थव्यवस्था पाहा. पण आपले लोक, 'कश्मीर बनेगा पाकिस्तान' असा विचार करत बसले आहेत. आमचे लोक, आमचे सरकार एवढे गरीब आहे की, आम्ही कोणाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली की त्यांना वाटते हे कर्ज मागायला येत आहेत.

दरम्यान भट यांचा हा व्हीडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत २५ हजार जणांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हीडीओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तान सरकारने अंतर्गत संघर्षावर मात करून भारतासारखी दमदार कामगिरी करावी, अशी इच्छा काहीजणांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानच्या उद्योगपतीने भारताला केले आवाहन; आमची मजल बिर्याणी अधिक चवदार करण्यापुरतीच

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest