तैवानने दाखवला ड्रॅगनला ठेंगा; चीनचा तीळपापड
# कॅलिफोर्निया
तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साय इंग-वेन यांनी बुधवारी चीनचा दबाव झुगारून लावत अमेरिकेच्या काँग्रेसचे सभापती केविन मॅकार्थी यांची भेट घेतली आहे. चीन तैवान हा चीनचा अविभाज्य घटक असल्याचे मानतो. त्यामुळे त्साय इंग-वेन यांनी स्वतंत्रपणे अमेरिकेचा अथवा अन्य देशांचा दौरा करणे चीनला पसंत नाही. तैवानने स्वतंत्रपणे असे दौरे करू नयेत, अशी धमकी चीनने वारंवार दिलेली आहे. असे असतानाही त्साय इंग-वेन या सध्या अमेरिका दौऱ्यावर आल्या आहेत.
त्साय इंग-वेन यांच्या भेटीनंतर चीनच्या रागाचा पारा चढला आहे. त्साय इंग-वेन यांनी लॉस एंजिल्स येथे मॅकार्थी यांची भेट घेतली. अमेरिका आणि तैवान यांच्यातील परस्परसंबंध सुधारण्यासाठी त्यांनी हा दौरा केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्या आता लॅटिन अमेरिकेतही जाणार आहेत. चीनने त्साय वेन यांच्यासोबतच मॅकार्थी यांनाही धमकी दिली आहे. मॅकार्थी यांनी आगीशी खेळू नये, असा इशाराच चीनने दिला आहे.
मॅकार्थी हे राष्ट्राध्यक्षपदाचे दावेदार मानले जातात.
आगीशी खेळू नका
दरम्यान तैवान आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमुळे संतापाचा तिळपापड झालेल्या चीनने अमेरिकेला धमकावले आहे. त्साय इंग-वेन यांना स्वतंत्र दर्जा देत तुम्ही चीनच्या भावनांशी खेळत आहात. तैवानच्या तथाकथित राष्ट्राध्यक्षाला भेटत अमेरिकेने 'वन चायना' धोरण, अमेरिका चीनमध्ये झालेल्या द्विपक्षीय सहकार्य कराराचे उल्लंघन केले आहे. याशिवाय चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले असल्याची प्रतिक्रिया चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी व्यक्त केली आहे. तैवान हा लोकशाही मूल्ये मानणारा देश असून इथे स्वतंत्र सरकार अस्तित्वात आहे. चीन मात्र तैवानला आप्ले घटकराज्य मानतो. तैवानकडे स्वतःची न्यायपालिका आहे, स्वतःचे लष्कर आहे. काही मोजकेच देश तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देतात. चीनच्या दहशतीने बहुतांश देश तैवानसोबत संबंध ठेवण्याचे नाकारतात. औपचारिकपणे अमेरिकेने वन चायना धोरणाला समर्थन दिले आहे, मात्र त्याचवेळी अमेरिका तैवानलाही पाठिंबा देत आले आहे.
मागच्या वर्षी तत्कालीन सभापती नॅन्सी पेलोसी या तैवान भेटीवर आल्या होत्या. त्यावेळीही चीनने अमेरिकेच्या दुटप्पी वर्तनाचा निषेध केला होता.