नाणेनिधीच्या विरोधानंतर पाकिस्तानात अनुदान सुरूच
#इस्लामाबाद
खाद्यान्न आणि इंधनासाठी अनुदान जाहीर करून पाकिस्तान सरकारने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) अनुदान बंद करण्याच्या अटीवरच कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानला नव्याने कर्ज देण्याची तयारी दाखवली होती. पण आता पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी पुन्हा अनुदान देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या नव्याने कर्ज मिळवण्यात अडसर निर्माण झाला आहे. निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाच्या विजयाची शक्यता लक्षात घेत शरीफ अनुदान जाहीर करत असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानच्या सरकारने आम्हाला न विचारता अनुदान जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप करत आयएमएफने पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला कर्ज मिळण्याची शक्यता नाकारली जात आहे. पाकिस्तान सरकार महागाईने वैतागलेले आहे. जनतेच्या दोन वेळच्या उदरनिर्वाहासाठी एखादी मदत योजना लागू करण्यासाठीही सरकारकडे निधी उरलेला नाही. अशावेळी मित्रदेशांकडे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नाही. अशा अवस्थेत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने इंधन खरेदीसाठी प्रतिलिटर ५० रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. ८०० सीसीच्या कार आणि दुचाकीधारकांनाच या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय पाकिस्तान सरकार गव्हाच्या पिठाच्या खरेदीसाठीही अनुदान देणार आहे.
कुठल्याही क्षणी पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने इंधनाच्या खरेदीवर दिल्या जाणाऱ्या अनुदानावर आक्षेप घेतला आहे. पुरेसा निधी नसल्याने नव्याने कर्ज काढण्याशिवाय सरकारला गत्यंतर नाही. अनुदान बंद केल्याशिवाय नाणेनिधी कर्ज देणार नाही, असे असतानाही पंतप्रधान शरीफ यांचे सरकार अनुदान जाहीर करत आहे. यामागे इम्रान खान यांचे आंदोलन कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानात कुठल्याही क्षणी सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक झाली तर शरीफ सरकारच्या कारभारावर नाराज जनता इम्रान खान यांच्या पारड्यात बहुमताचा कौल देईल, ही शक्यता नाकारता येत नाही. त्या भीतीपोटी शरीफ सरकार अनुदान जाहीर करत असल्याची चर्चा आहे.
वृत्तसंस्था