अंधेरा कायम रहे !
#कराची
अर्थव्यवस्था ढासळल्याने पाकिस्तानचे भवितव्य असेही अंधःकारमय झालेले आहे, मात्र प्रत्यक्षातही कराची शहरातील ४० टक्के भाग वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यातही असाच तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावेळी पाकिस्तानातील चार प्रमुख शहरांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
कराची शहरातील अनेक भागांत विद्युत पुरवठा बंद झाला आहे. उच्चतम दाबाची विद्युत वाहक यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगण्यात येत आहे. नुमाईश चौरंगी, पंजाब कॉलनी, गुलिस्तान-ए -जोहर, डिफेन्स लाईन एरिया, कोरंगी, न्यू कराची, उत्तर कराची, क्लिफ्टन, ओरंगी, गुलशन- ए-इकबाल, उत्तर नाजिमाबाद, गुलशन-ए-हदीद, ओल्ड सिटी एरिया, पाक कॉलनी, सरहदनगर आदी परिसरातील वीजपुरवठा मागील ४८ तासांपासून खंडित झालेला आहे.
या परिसराला वीज पुरवण्याचे काम के-इलेक्ट्रिक कंपनीकडे आहे. या कंपनीचे प्रवक्ते इम्रान राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल ग्रीडच्या तीव्रतेतील चढ उतारामुळे शहरातील विजपुरवठा खंडित झाला आहे. केवळ कराचीच नव्हे तर पाकिस्तानमधील अन्य शहरांच्या वीज पुरवठ्यावरही या चढ-उत्तराचे परिणाम होत असतात. सप्टेंबर २०२१ ला कराची शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
वीजनिर्मिती क्षेत्रातील कर्मचारी नाराज
वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या कंपनीकडून वीजपुरवठा खंडित होण्यामागे तांत्रिक कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र वीजनिर्मिती क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नाराजी हे यामागील खरे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्यानेच असा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. वृत्तसंस्था