उत्तर कोरियावर उपासमारीचे संकट
#सेऊल
आपल्या आण्विक संशोधन केंद्रामुळे अमेरिकेवर वचक निर्माण करणाऱ्या उत्तर कोरिया सध्या खाद्यान्न संकटाला सामोरे जात आहे. कोरोनानंतरच्या काळात उत्तर कोरियात निर्माण झालेल्या उपासमारीच्या समस्येवर हुकूमशहा किम जोंग उनला उपाय शोधता आलेला नाही. कोरियन जनता उपासमारीच्या विळख्यात असून प्रशासनाने मात्र सर्व काही आलबेल असल्याचा देखावा केला आहे.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग सध्या देशाच्या अन्न टंचाईवर मात करण्यासाठी शाश्वत कृषी धोरणावर काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी एक आपत्कालीन बैठकीचे आयोजन केले असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. कोरियन द्वीपकल्पात अमेरिकेला हस्तक्षेप करू द्यायचा नाही, असा चंग बांधलेल्या सत्ताधारी वर्कर्स पक्ष आणि हुकूमशहा किम यांना अन्न टंचाईवर मात करणे अनिवार्य आहे. केवळ पक्षाच्या परराष्ट्र धोरणावर जनता समाधानी राहणार नाही.
देशाच्या कृषी विकासात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी कृषी उत्पादनातील वाढीसाठी सत्ताधारी पक्षाकडून निधी दिला जाण्याची शक्यता आहे. खाद्यसंकटावर मात केल्याशिवाय किम आण्विक कार्यक्रमाला प्राधान्य देणार नसल्याचा विश्वास प्योन्गयांग विद्यापीठातील कृषिशास्त्रज्ञ लिम येऊल चूल यांचे म्हणणे आहे. उत्तर कोरियासाठी उपासमारीची समस्या नवी नाही. कमी अधिक प्रमाणात कोरियन जनता उपासमारीला सामोरी जातच असते. १९९० साली उत्तर कोरियातील उपासमारीचे संकट मोठ्या तीव्रतेने जाणवले होते. जगभर त्यावर चर्चा झाली होती.