ॲपलमध्येही कर्मचारी कपातीचे वारे
#कॅलिफोर्निया
गेल्या काही महिन्यांपासून जागतिक मंदीची चर्चा सुरू आहे, पण प्रत्यक्षात तशा अधिकृत नोंदी दिसत नाहीत, पण कदाचित याचाच परिणाम म्हणून की काय अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये गुगल, अॅमेझॉन, फेसबुकची मदर कंपनी मेटा यांच्यानंतर आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपलनेही कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. अर्थात कंपनीने नेमके किती कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार हे स्पष्ट केले नसले तरी आर्थिक ताळेबंद राखण्यासाठी असा निर्णय लागू केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालासनुसार, अॅपलच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा फटका कंपनीच्या डेव्हलपमेंट आणि प्रिझर्व्हेशन टीमला बसणार आहे, पण नेमके किती कर्मचारी काढून टाकण्यात येणार आहेत, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. एकदम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यापेक्षा कंपनीने जरा वेगळा प्रयोग करायला सुरुवात केली आहे.
अॅपलने मुलाखतीनंतर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेण्याऐवजी पुन्हा अर्ज करायला सांगितले आहे. या कर्मचारी कपातीचा फटका अॅपलच्या रिटेल स्टोअर्स आणि इतर सुविधा केंद्रांतील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
जगभरातील महागाईचे प्रमाण वाढल्याने व्याजाचे दर वाढले आहेत. त्यामुळेच जगभरात सध्या आर्थिक मंदीची स्थिती असल्याच्या बातम्या यापूर्वीच आल्या आहेत. याचा फटका अनेक बड्या टेक कंपन्यांना बसला आहे. यामध्ये फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाने दोन टप्प्यात कर्मचारी कपात केली. पहिल्या टप्प्यात ११ हजार त्यानंतर १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.
तसेच गुगलने गेल्या वर्षी आपल्या १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. कंपनीची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याचबरोबर अॅमेझॉनने २७ हजार कर्मचाऱ्यांची दोन टप्प्यात कपात केली होती. पहिल्या टप्प्यात १८ हजार कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात ९ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती.