नव्या राजधानी उभारणीला वेग
#जकार्ता
इंडोनेशियाच्या राजधानीचे शहर जकार्ता समुद्रात बुडण्याची शक्यता लक्षात घेत सरकारने नवी राजधानी उभारणीचे काम हाती घेतले आहे. बोर्नियो बेटावर ही राजधानी उभारण्यात येत आहे. स्थानिक नैसर्गिक रचना अबाधित ठेवत या नव्या शहराची उभारणी करण्यात येत आहे.
'नुसंतारा' असे या नव्या शहराचे नाव असणार आहे. शाश्वत पर्यावरणाचा विचार करून या शहराचा विकास केला जाणार आहे. माणसांसोबत वन्य जिवांचा अधिवास इथे असणार आहे. २०४५ पर्यंत ही नवी राजधानी 'कार्बन न्यूट्रल' केली जाणार आहे. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण नियंत्रित करण्यावर भर दिला जाणार आहे. २ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रातील केवळ ६५ टक्के भूभागातच मानवी वास्तव्य असणार आहे. उर्वरित क्षेत्रात कसलेच बांधकाम केले जाणार नाही. सरकारी कार्यालये, आणि निवासी इमारतींचे बांधकाम करताना पर्यावरणपूरक संसाधनांचा वापर केला जाणार असल्याचे राष्ट्रपती जिको विडोडो यांनी स्पष्ट केले आहे. पुढच्या वर्षी म्हणजे १७ ऑगस्ट २०२३ रोजी नव्या शहराचे उद्घाटन केले जाणार आहे. या दिवशी प्रमुख प्रशासकीय इमारतीत कामकाज सुरू होणार आहे. जकार्तामध्ये १० लाख लोक वास्तव्य करतात. २०५० पर्यंत जकार्ताचा ७५ टक्के भूभाग समुद्रात बुडणार असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सततचा पूर, भूकंप, प्रदूषण यामुळे जकार्तावर नेहमीच नैसर्गिक आपत्ती येतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो. हे टाळण्यासाठीच सरकारने नव्या शहराच्या उभारणीचा निर्णय घेतला आहे.
वृत्तसंंस्था