संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क : तुमच्या आई-वडिलांकडून किंवा वर्तमानपत्रातून तुम्ही सत्तरच्या दशकात अमेरिकेची अवकाश प्रयोगशाळा स्कायलॅब पृथ्वीवर कोसळणार असल्याच्या अफवेची बातमी ऐकली असणार किंवा ऐकली नसेल तर गुगलवर सर्च करून पाहा. त्यावेळी अनेकांनी पृथ्वी नष्ट होणार म्हणून चांगले चुंगले पदार्थ बनवून खाल्ले होते. काहींनी तर शेवटच्या इच्छा देखील पूर्ण करून घेतल्या होत्या. अखेर ‘स्कायलॅब’ ला समुद्रात कोसळवण्यात नासाच्या शास्रज्ञांना यश मिळाले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. आता अमेरिकेतील फ्लोरिडा प्रातांतील एक कुटुंबाने अमेरिकेची जगप्रसिद्ध अंतराळ संस्था नासावर तब्बल ८० हजार डॉलरचा ( सुमारे ६६ लाख ८५ हजार रुपये ) नुकसानभरपाईचा मजबूत दावा ठोकला आहे.
८ मार्च २०२१ रोजी अंतराळातून ७०० ग्रॅम वजनाचा एक तुकडा या अमेरिकन कुटुंबाच्या छतावर कोसळला आणि त्यामुळे त्यांच्या छताला छिद्र पडले होते. या घटनेनंतर नासाच्या संशोधकांनी या तुकड्याची तपासणी केली असता ती अंतराळात प्रयोगशाळेच्या वापरलेल्या बॅटरीचा तुकडा होता. साल २०२१ मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने (आयएसएस ) हा अंतराळात कचरा म्हणून सोडला होता. अमेरिकन स्पेस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की खरे तर असे तुकडे अंतराळात फिरत असतात. ते फिरत फिरत कधी पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत शिरले तर जळून आकाशातच नष्ट होतात. परंतु हा बॅटरीचा पार्ट नष्ट झाला नसल्याने नेमका घरावर कोसळला असावा, असे स्पष्ट केले.
'क्रॅनफिल समनेर' ही कायदा फर्म या कुटुंबाची केस लढवत आहे. वकिली मदत पुरवणाऱ्या या संस्थेच्या मते त्यांच्या अशिलाचे फ्लोरिडाच्या नेपल्स येथे एलेजांद्रो ओटेरो यांचे घर आहे. बॅटरीचे नकोसे पार्ट आकाशातून थेट घरावर कोसळ्याने त्यांना काही बरेवाईट झाले असते तर ? घटनेत सुदैवाने त्यांच्या छताला छिद्र पडले आहे. परंतु जीव जाण्याचा देखील धोका होता, म्हणून ही नुकसानभरपाई मागण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा अंतराळातून ही अवजड वस्तू घरावर कोसळली तेव्हा त्यांचे अशील ओटेरा यांचा मुलगा डॅनियल घरी एकटा होता. या घटनेत सुदैवाने त्याला काही झाले नाही. परंतु नासाच्या हलगर्जीने एखाद्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो, असे फर्मने म्हटले आहे. आपल्या क्लायंटच्या जीवनावर या घटनेने आघात झाला आहे. त्याची नुकसान भरपाई त्यांना मिळायलाच हवी, असे वकील मीका गुयेन वर्थी यांनी सांगितले. अंतराळातील कचऱ्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भविष्यात यामुळे अपघात देखील होऊ शकतात. नासाने या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया याबाबत दिलेली दिसत नाही.