... म्हणून वाढला मुइज्जू यांचा आत्मविश्वास
#माले
मालदीवचे अध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी भारतद्वेषी विधाने करणे सुरूच ठेवले आहे. मालदीवमधील भारताचे सैनिक काढून घेण्याच्या त्यांच्या आवाहनानंतर भारताकडून ही प्रक्रिया सुरू असतानाच त्यांच्या जागी सामान्य वेशातीलही कोणते भारतीय अधिकारी नकोत, अशी भूमिका मुइज्जू यांनी घेतली आहे. त्यांच्या या विधानामागी कारणेही आता जगासमोर आली आहेत. चीनने नुकतेच द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी मोफत लष्करी मदत देण्यासाठी मालदीवसोबत संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. चीनच्या जोरावर मुइज्जू भारताबाबत आक्षेपार्ह विधाने करत सुटले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालदीवच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी टिपणी केल्यानंतर भारताबरोबरील या देशाचे संबंध तणावाचे झाले आहेत. भारतीयांनी मालदीवमधील पर्यटनावर अघोषित बहिष्कार घातल्याने या देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. या तणावातच, मालदीवमध्ये तैनात असलेली लष्कराच्या हवाई विभागाची तीन पथके १० मार्चपर्यंत माघारी बोलवावीत, अशी मागणी मालदीवने केली होती. भारताने ही मागणी मान्य करत तीन पथकांपैकी एका लष्करी पथकाला जबाबदारीतून मुक्त करून त्यांची जागा घेण्यासाठी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचे एक पथकही मालदीवला पाठविले आहे. मात्र, १० मार्चनंतर मालदीवमध्ये भारताचा गणवेशातीलच नव्हे, तर सामान्य वेशातीलही कोणी अधिकारी नको, असे मुइज्जू यांनी बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.मुइज्जू म्हणाले, भारतीय सैनिकांना हाकलून लावण्यात आमचे सरकार यशस्वी होत असल्यानेच काही जण परिस्थितीला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
चीनच्या रसदीवर मालदीवच्या उड्या
चीनने द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी मोफत लष्करी मदत देण्यासाठी मालदीवसोबत संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय लष्करी जवानांना माघारी बोलवण्याची सूचना केली होती. मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा करण्यासाठी चीनच्या आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य कार्यालयाचे उपसंचालक मेजर जनरल झांग बाओकून यांची भेट घेतली.चीनने मालदीवला १२ इको-फ्रेंडली रुग्णवाहिकाही भेट दिल्या आहेत. मालदीवच्या आरोग्य मंत्रालयात आयोजित समारंभात चीनचे राजदूत वांग लिक्सिन यांनी मालदीवला रुग्णवाहिका भेट देणारे पत्र दिले. अलीकडेच, मालदीवने चीनी हाय-टेक संशोधन जहाज 'जियांग यांग हाँग-०३' ला माले बंदरात डॉक करण्याची परवानगी दिली. या जहाजाला हिंदी महासागरात जाण्यास श्रीलंकेने परवानगी नाकारल्यामुळे चिनी जहाजाला मालदीवला जावे लागले. श्रीलंकेने आपल्या आदेशात म्हटले आहे की ते कोणत्याही संशोधन जहाजाला त्यांच्या आर्थिक क्षेत्रात प्रवेश करू देणार नाही. भारताच्या सांगण्यावरून श्रीलंकेने हे कृत्य केल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे आता मालदीवने सर्व भारतीय सैनिकांना माघारी जाण्यास सांगितले आहे.