Sitharaman : सीतारामन यांनी पाश्चिमात्य देशांना सुनावले

भारतातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबाबत निर्माण केले जाणारे चित्र आणि प्रत्यक्षातील परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. जगातल्या इस्लामिक देशांपेक्षा भारतातील मुस्लीम अधिक सुरक्षित आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 12 Apr 2023
  • 02:34 am
सीतारामन यांनी पाश्चिमात्य देशांना सुनावले

सीतारामन यांनी पाश्चिमात्य देशांना सुनावले

अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, वस्तुस्थिती पाहा; भारतीय मुस्लीम जगात सर्वाधिक सुरक्षित

#वॉशिंग्टन

भारतातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबाबत निर्माण केले जाणारे चित्र आणि प्रत्यक्षातील परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. जगातल्या इस्लामिक देशांपेक्षा भारतातील मुस्लीम अधिक सुरक्षित आहेत. एवढेच काय पाश्चिमात्य देश ज्या पाकिस्तानबद्दल सहानुभूती व्यक्त करतो तिथल्या मुस्लिमांपेक्षा भारतीय मुस्लीम अधिक सुरक्षित आणि समाधानी असल्याचे भाष्य भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेत केले आहे. भारतातील अल्पसंख्याकांबद्दल निर्माण केलेल्या खोट्या प्रचारावर विसंबून राहण्यापेक्षा वस्तुस्थितीचा विचार करा, अशा शब्दांत त्यांनी पाश्चिमात्य देशांना खडसावले आहे.

सीतारामन सध्या या अमेरिका दौऱ्यावर आहेत. 'पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स' या संस्थेत आयोजित एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी या विषयावर दिलखुलास भाष्य केले. भारतातील मुस्लिमांची स्थिती खूपच चांगली आहे, लोकांनी भारतात येऊन हे पाहावे.

भारताची बदनामी करण्याच्या हेतूने प्रसारित केल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. अपप्रचारावर विसंबून राहण्यापेक्षा भारतात या, पाहा आणि ठरवा. भारतात मुस्लीम लोक आनंदाने राहतात. उलट पाकिस्तानात अल्पसंख्याकांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे.  भारतात मुस्लीम व्यवसाय करतात, त्यांची मुले शिक्षण घेत आहेत, त्यांना सरकारकडून फेलोशिप दिली जात आहे.  

भारतातील मुस्लिमांवर अन्याय होत असल्याच्या अपप्रचाराचा गुंतवणुकीवर दुष्परिणाम होतो का? या 'पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचे अध्यक्ष अॅडम एस. पोसेन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन यांनी, याचे उत्तर मागील काही वर्षांत भारतात उद्योग सुरू केलेल्या गुंतवणूकदारांना विचारावे लागेल. गुंतवणूकदार अपप्रचाराला भुलले नाहीत. राजकीय स्थैर्य असलेल्या देशातच उद्योग, व्यवसाय फुलत असतात. भारतातील अल्पसंख्याकांबाबत माध्यमे जे एकांगी वार्तांकन करतात, पाश्चिमात्य देशांसमोर जो आभास निर्माण केला जातो, त्याला गुंतवणूकदार भुलले नसल्यानेच जगभरातील गुंतवणूकदारांचा ओढा भारताकडे राहिला असल्याचेही सीतारामन यांनी नमूद केले.

तर एवढी लोकसंख्या वाढली असती का?

सर्वाधिक मुस्लीम वास्तव्य करतात असा भारत हा दुसरा लोकशाही देश आहे. ही लोकसंख्या सतत वाढत आहे. देशात मुस्लिमांवर अत्याचार होतात किंवा त्यात काही तथ्य असेल तर १९४७ नंतर भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या सातत्याने वाढली असती का, असा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानचा संदर्भ देत सीतारामन म्हणाल्या, भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानने स्वतःला मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केले. असे असूनही पाकिस्तानमध्ये मुजाहिदीन, शिया आणि इतर गटांसोबत हिंसाचार होत आहे. मात्र मुख्य प्रवाहातील माध्यमे त्याचे वार्तांकन करत नाहीत.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest