File Photo
#वॉशिंग्टन
feedback@civicmirror.in
अमेरिकेतील निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले असून या निवडणुकीत भारतीय वंशाचे नागरिक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी येथील भारतीयांचे महत्त्व काही कमी होणार नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस जिंकल्या तर त्या अमेरिकेतील पहिल्या भारतीय वंशाच्या अध्यक्ष होतील. दुसरीकडे, रिपब्लीकन पक्षाचे माजी अध्यक्ष ट्रम्प विजयी झाले तर त्यांच्या प्रशासनात भारतीयांचे प्रतिनिधित्व सर्वाधिक असेल.
ट्रम्प यांच्या गेल्या अध्यक्षीय काळात ८० हून जास्त भारतीय वंशाच्या अमेरिकींना वरिष्ठ पदांवर नियुक्त केले होते. त्यांच्या प्रचार व्यवस्थापकाच्या माहितीनुसार आता ट्रम्प सत्तेवर आले तर ही संख्या १५० हून जास्त होऊ शकते. कमला व ट्रम्प यांच्या प्रचार पथकांनी शॅडाे कॅबिनेटची रूपरेषा तयार केली आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकींचा दबदबा राहण्याची शक्यता आहे. कमला हॅरिस यांच्या शॅडाे कॅबिनेटमध्ये ५ तर ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्येही ४ ते ५ भारतीय वंशाचा नागरिकांचा समावेश होऊ शकताे.
माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ८ वर्षांच्या कार्यकाळात भारतीय वंशाच्या ६० हून अधिक भारतीयांना वरिष्ठ पदांवर नियुक्त केले होते. अध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या १३० भारतीयांना वरिष्ठ पदांवर नियुक्त केले होते. निवडणुकीच्या निकालानंतर, ट्रम्प किंवा कमला हॅरिस विजयी होवोत १५० हून अधिक भारतीय वंशाचे नागरिक वरिष्ठ पदांवर नियुक्त केले जातील.
यादीत सर्वात वरती नीरा टंडन यांचे नाव आहे. त्या व्हाइट हाऊस ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँँड बजेटच्या संचालक आहेत. माजी सर्जन जनरल डॉ.विवेक मूर्ती कायम राहतील.न्याय विभागात माजी असोसिएट ॲटर्नी जनरल वनिता गुप्ता, नागरिक सुरक्षेतील माजी अवर सचिव उजरा जेया, आशियाई अमेरिकींवरील अध्यक्षांचे सल्लागार आयोगाचे माजी सदस्य अजय जैन भूतोरिया तसेच सुमानो गुहा यांची नियुक्ती कायम असेल.
हॅरिस प्रशासनात ज्या भारतीय वंशाच्या नेत्यांना मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे, त्यात अमेरिकी काँग्रेसचे ५ नेते सर्वात पुढे आहेत. अमेेरिकी काँग्रेसचे सदस्य डॉ. अमी बेरा, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती, श्री ठाणेदार आणि प्रमिला जयपाल यांची नावे आघाडीवर आहेत. सूत्रांनुसार, कमला हॅरिस प्रशासनात वरिष्ठ भूमिकांसाठी नियुक्त केलेल्यांमध्ये निम्म्याहून अधिक भारतीय अमेरिकी असतील. ओबामा प्रशासनाद्वारे नियुक्त केलेल्या काही लोकांना कायम ठेवले जाण्याची अपेक्षा आहे.
ट्रम्प यांच्या प्रशासनात माजी मुख्य उप प्रेस सचिव राज शाह, युनायटेड स्टेट्स फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अध्यक्ष अजित पै आणि व्हाइट हाऊसमधील माहिती आणि नियामक व्यवहार कार्यालयाच्या प्रशासक निओमी राव यांचा समावेश असेल. सेंटर्स फॉर मेडिकेअर अँड मेडिकेड सर्व्हिसेसच्या माजी प्रशासक सीमा वर्मा, फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशनचे माजी अध्यक्ष नील चॅटर्जी तसेच मनीषा सिंग विशाल अमीन यांचाही समावेश असेल.
ट्रम्प कॅबिनेटमध्ये विवेक रामास्वामी आणि निक्की हेली यांची नावे सर्वात पुढे आहेत. दोन्ही उमेदवार उमेदवारीच्या शर्यतीत होते. त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा देऊन त्यांनी माघार घेतली. दोघांना मंत्रिमंडळात जागा मिळू शकेल.अमेरिकी सुरक्षा परिषदेती अधिकारी वकील काश पटेल मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. रिपब्लिकन हिंदू आघाडीचे संस्थापक शलभ कुमार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांनी ट्रम्प यांच्यासाठी ३४८५ कोटी दिले आहेत. याशिवाय राज शाह हेही स्पर्धेत आहेत. वृत्तसंंस्था