#बैरुत / जेरुसलेम
feedback@civicmirror.in
लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्राएली हवाई दलाने गुरुवारी मध्यरात्री हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहचा उत्तराधिकारी हाशिम सफीउद्दीन याला लक्ष्य केले. हाशेम हा इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाहचा प्रमुख होणार असल्याची चर्चा आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहची शिकार केल्यावर ही संघटना पूर्णपणे नष्ट करण्याच्या उद्देशाने इस्राएलने सफीउद्दीनला लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे इस्राएल एकाच वेळी इराण, लेबनॉन आणि हमासवर हल्ले करत असताना हिजबुल्लाहच्या अनेकांचा मृत्यू झाला आहे.
इस्त्रायली संरक्षण दल (आयडीएफ) किंवा लेबनॉनमधील हिजबुल्लाहकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ च्या म्हणण्यानुसार, इस्त्रायलने गुरुवारी मध्यरात्री बैरूतवर पुन्हा तीव्र हवाई हल्ल्याचा मारा केला. यावेळी हिजबुल्लाहचा वरिष्ठ नेत्यांबरोबर सफीउद्दीन भूमिगत बंकरमध्ये चर्चा करत होता. इस्राएलने नसराल्लाहला ठार केल्यापासून गुरुवारचा या भागातील सर्वात मोठा बॉम्बहल्ला होता.
लेबनॉनच्या मीडियाचा हवाला देऊन एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारचा इस्राएली हल्ला नसराल्लाहला मारल्या गेलेल्या हल्ल्यापेक्षा खूप मोठा होता. यातील मृतांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. २०१७ मध्ये अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेला हाशेम सफीउद्दीन हा हिजबुल्लाहच्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
त्याच्या लष्करी कारवायांचे व्यवस्थापन करणाऱ्या गटाच्या जिहाद परिषदेचा तो सदस्य आहे. नसराल्लाहचा चुलत भाऊ असलेला सफीउद्दीन हिजबुल्लाहमध्ये नंबर दोन असल्याचे मानले जाते. तसेच, त्याचे इराणी राजवटीशी अतिशय जवळचे संबंध आहेत. नसराल्लाहने हिजबुल्लाहच्या संघटनेत विविध प्रभावशाली पदांवर सफीउद्दीनची नियुक्ती केली होती. अनेकवेळा त्याने गटाचा प्रवक्ता म्हणूनही भूमिका बजावली आहे.
इस्राएलने आपल्या शेजारील शत्रू राष्ट्रांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. तसंच, पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासलाही लक्ष्य केलं आहे. एकाच वेळी इराण, लेबनॉन आणि हमासवर हल्ले करत असताना हिजबुल्लाहच्या अनेकांचा मृत्यू झाला आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाहचा खात्मा केल्यानंतर आता हमासच्या तिघांनाही ठार केल्याची माहिती इस्राएली लष्कराने दिली आहे. इस्रायल संरक्षण दलाने गुरुवारी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचा गाझामधील सरकार प्रमुख रावी मुश्ताहा यांच्यासह तीन वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा दावा केला. वृत्तसंंस्था
मोहम्मद अनिसीला संपवले
इस्राएलने केलेल्या दाव्यानुसार बैरूतमधील हिजबुल्लाहच्या गुप्तचर शाखेला लक्ष्य करणाऱ्या नुकत्याच केलेल्या हवाई हल्ल्यात त्यांनी आणखी एक वरिष्ठ अधिकारी मोहम्मद अनिसी याला संपविण्यात यश मिळवले आहे. अनिसी याने हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
इस्रायली लष्कराच्या दाव्यावर हिजबुल्लाह ने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गुरुवारी, बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले झाले. बॉम्बस्फोटात अनेक लोक ठार झाले आणि लेबनॉनच्या राजधानीतील अनेक किलोमीटर दूर असलेल्या इमारती हादरल्या. त्याचे कारण म्हणजे इस्राएलने हिजबुल्ला विरोधात वाढवलेली हवाई हल्ल्यांची तीव्रता.