लेबनॉनची स्थिती गाझासारखी करू

गेल्या काही दिवसांपासून इस्राएल आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची धार वाढत असून इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनची स्थिती गाझासारखी करण्याची धमकी दिली आहे.

इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची धमकी, हिजबुल्लाहपासून देश मुक्त करण्याचे आवाहन

जेरुसलेम : गेल्या काही दिवसांपासून इस्राएल आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची धार वाढत असून इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनची स्थिती गाझासारखी करण्याची धमकी दिली आहे. यामुळे नजीकच्या काळात मध्य पूर्व आशियातील संघर्ष मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाहला ठार केल्यानंतर इस्राएलने लेबनॉनच्या दक्षिण आणि उत्तर भागावर लक्ष केंद्रीत केले आहे.इस्राएलने  हिजबुल्लाहची वरची सगळी फळी पूर्णपणे नष्ट केली आहे. यामुळे  हिजबुल्लाह आता कोणाच्या नेतृत्त्वाखाली काम करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. हसन नसरल्लाह नंतर त्याचा उत्तराधिकारी हाशेम सफीउद्दीनही मारला गेला आहे.

इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी लेबनॉनला कडक इशारा दिला असून त्यात ते म्हणतात, लेबनॉनने  हिजबुल्लाहला आपल्या देशात काम करण्यास परवानगी दिली तर त्यांची  स्थिती गाझासारखी होऊ शकते. हिजबुल्लाहपासून तुमचा देश मुक्त करा. यामुळे हे युद्ध संपू शकेल आणि पुढील विध्वंस टाळता येईल. नेतन्याहू यांनी एका व्हीडीओच्या माध्यमातून लेबनॉनच्या लोकांना उद्देशून हा संदेश दिला आहे. एवढंच नाही तर नेतन्याहू यांनी लेबनॉनच्या लोकांना  हिजबुल्लाहला देशाबाहेर बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हसन नसराल्लाहचा उत्तराधिकारी हाशेम सफीउद्दीन मारला गेल्याची त्यांनी पुष्टी केली.

नेतन्याहू  इशारा देत असतानाच इस्राएली सैन्याने लेबनॉनच्या दक्षिण किनारपट्टीवर हिजबुल्लाहविरोधातील आपले आक्रमण अधिक तीव्र केले आहे. त्यातच हिजबुल्लाह पराभव स्वीकारायला तयार दिसत नाही. इस्राएल विविध भागांवर हल्ले करत आहे. हिजबुल्लाहच्या अझीझ युनिटचे ५० तळ आणि नासेर युनिटचे ३० तळ इस्त्राएलने उद्ध्वस्त केले आहेत. कारवाई सुरूच राहील. इस्राएली लष्कराने म्हटले आहे की, लवकरच लेबनॉनच्या किनारपट्टीवर कारवाई सुरू होईल. यामुळे भूमध्य समुद्राच्या ६० किलोमीटर परिसरातील रहिवासी आणि मच्छिमारांना किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.  इ्स्त्राएली लष्कराची आता उत्तरेकडील भागावर लक्ष केंद्रीत करण्याची योजना आहे. 

७ ऑक्टोबरला हिजबुल्लाहने इस्त्राएलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुद्री भागावर रॉकेट डागले होते. त्याला प्रत्युत्तर देताना इस्राएली सैन्याने हिजबुल्लाहच्या भूमिगत स्थानांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि बॉम्बफेक केली आहेत. लेबनॉनमधील हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे ५० दहशतवादी मारले गेले आहेत. दक्षिण लेबनॉनमधील हल्ल्यात हिजबुल्लाहचे सहा कमांडर मारले गेले असून हिजबुल्लाहचे प्रमुख कमांडर अहमद हसन नाझल यचा मृत्यू झाला आहे. नाझल बिंट जबेल क्षेत्राचा प्रभारी होता आणि तेथून इस्राएलवर हल्ले करत होता. याशिवाय गजर सेक्टर प्रमुख हसीन तलाल कमाल, मुसा दिव बरकत, महमूद मुसा, अहमद इस्माईल आणि अब्दुल्ला अली डिकीक हेदेखील मारले गेले. एवढेच नाही तर इस्त्राएलच्या हवाई दलाने हिजबुल्लाहच्या नासिर, बद्र आणि अझीझ युनिटवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest