संग्रहित छायाचित्र
खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्या दरम्यान मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला. या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर संस्थांच्या सहभागाच्या कॅनडाच्या आरोपामुळे खूप मोठे वादंग निर्माण झाले. यावर भारताने आपल्या कॅनडामधील संजय कुमार वर्मा या राजदूतांना परत बोलावून आपला निषेध नोंदवला आहे. वर्मा यांनी नुकताच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर राजकीय फायद्यासाठी उभय देशांमधील संबंध बिघडवल्याचा आरोप केला आहे.
खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या गेल्या वर्षी १८ जून रोजी ब्रिटिश कोलंबियाजवळच्या एका गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर संस्थांचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाकडून सातत्याने केला गेला. परंतु यावर भारताने पुरावे मागितल्यावर कुठल्याच प्रकारचे पुरावे देता न आल्यामुळे भारताने राजनैतिक संबंध तोडत याविरुद्ध कडक पावले उचलत आपला निषेध नोंदवला आहे. संजय कुमार वर्मा यांनी कॅनडातील एका खासगी वृत्तवाहिनी सीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय वर्मा म्हणाले, “हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केवळ आरोप केले, मात्र ते या प्रकरणी एकही पुरावा सादर करू शकले नाहीत. कॅनडाने मात्र गुप्त माहितीच्या आधारावर आरोप केले होते. कॅनडियन सरकारनं हे मान्य केलं आहे की, या आरोपाबद्दल त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. कॅनडाकडे केवळ गुप्त माहिती जर होती तर तुम्हाला दोन देशांमधील संबंध बिघडवायचे असतील तर, तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. ट्रुडो यांनी नेमकं तेच केलं”.
कॅनडातील फेडरल निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांमधील परदेशी हस्तक्षेप या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशी समितीपुढे साक्ष देताना ट्रुडो यांनी हे सपशेल मान्य केले की, “होय आम्ही निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतीय एजंट्सवर आरोप केले होते. गुप्तहेर खात्याने सादर केलेल्या माहितीच्या आधारे ते आरोप केले गेले होते. मात्र, त्यासाठी कोणताही ठोस पुरावा नव्हता”.
संजय कुमार वर्मा यांनी फेटाळले आरोप?
मुलाखती दरम्यान संजय वर्मा यांना निज्जरच्या हत्येशी भारताचा काही संबंध आहे का? यावर वर्मा म्हणाले, “अजिबात नाही. भारताचा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही. तसेच कॅनडाने केवळ आरोप केले आहेत. पुरावा मात्र दिला नाही. केवळ राजकीय प्रेरणेतून हे आरोप केले गेले आहेत”.