संग्रहित छायाचित्र
इस्लामाबाद : आर्थिक स्थितीने घाईस आलेल्या पाकिस्तानमधील प्रशासनाच्या अब्रुची लक्तरेही वेशीवर टांगली जात आहेत. पाकिस्तानची (Pakistan) राष्ट्रीय बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या एका शाखेने वितरीत केलेल्या बंडलमध्ये तसेच एटीएममधून आलेल्या काही नोटा एका बाजूने कोऱ्या असून त्यांची छपाई केवळ एका बाजून झाल्याचे आढळले आहे. या धक्कादायक प्रकाराने देशाच्या अर्थव्यवस्थेची धुरा हाती असलेल्या स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या (State Bank of Pakistan) अब्रुचे धिंडवढे निघाले आहेत.
तीन दशकांपूर्वी आमिर खान आणि माधुरी दिक्षितचा दिल हा चित्रपट झळकला होता. त्यात आमिर खानचे कंजूस वडील हजारीप्रसाद म्हणजेच अनुपम खेर हा मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना नोटा देतो. या नोटा एकाच बाजूने छापलेल्या असल्याचे उघडकीस येताच सर्व भिकारी अनुपम खेरला मारण्यासाठी धावतात. अशीच गत स्टेट बँक ऑफ पाकिस्तानची झाली आहे.
या धक्कादायक प्रकाराने नागरिक संतापले असून अर्धवट छापलेल्या नोटाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने दिले आहेत. तसेच या व्हीडीओची खातरजमा केली जात आहे. पाकिस्तानच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीची जगभर चर्चा झाली आहे. धान्यांसाठी सरकारी रेशन दुकानावर रांगा लागत असून गव्हाच्या पिठासाठी मारामारी होत आहे. मात्र आता आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पाकिस्तानच्या स्टेट बँकेकडून नोटांची छपाईदेखील योग्य रितीने होताना दिसत नाही. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जारी केलेल्या काही नोटा एकाच बाजूने छापलेल्या असून दुसऱ्या बाजूने कोऱ्या आहेत. या सदोष नोटा लोकांच्या हातात आल्याने खळबळ उडाली आहे. या नोटा परत करण्यासाठी नागरिक धावाधाव करत आहे. या अर्धवट नोटाचा व्हीडीओ बँकेतील एका कर्मचाऱ्यानेच तयार केला आहे. पाकिस्तानातील वर्तमानपत्र डॉनच्या माहितीनुसार सोशल मीडियावर याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने याची चौकशी करण्याची घोषणा केली.
व्हायरल व्हीडीओतील व्यक्ती स्वत:ला नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानच्या मॉडेल कॉलनीचा शाखा व्यवस्थापक असल्याचे सांगतो. यात तो एकाच बाजूने छापलेली एक हजार रुपयाची नोट दाखवतो. विशेष म्हणजे ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर बॅक कर्मचाऱ्यांना अर्धवट नोटांची माहिती कळाली. तो म्हणतो, अशा प्रकारे अर्धवट छापलेल्या नोटा किती चलनात आल्या आहेत, हे ठाऊक नाही. ग्राहकांनी नोटा परत केल्यानंतरच त्याचा शोध लागला. यानंतर हा व्यक्ती अन्य कर्मचाऱ्याकडे कॅमेरा घेऊन जाताना दिसते. तो कर्मचारी नोटांची मोजणी करतो तेव्हा त्यात काही अर्धवट छापलेल्या नोटा दिसतात. बहुतांश बंडलमध्ये दोन ते तीन नोटा अर्धवट छापल्याचे आढळले आहे.
सोशल मीडियावर अर्धवट नोटांची माहिती व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एक्स, फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हीडीओ शेअर करत नागरिकांनी पाकिस्तानच्या बँकेला लाखोली वाहिली आहे. एका यूजरने म्हटले आहे की, बँक आणि एटीएममधून रोकड काढत असाल तर सावध राहा. ोटा बघून घ्या. एका एका नोटांची तपासणी करा. दरम्यान, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या मुख्य प्रवक्त्याने म्हटले, ‘हा व्हीडीओ खरा आहे की नाही, त्याची तपासणी केली जात आहे. तसेच ही एक दुर्मीळ घटना आहे. हे प्रकरण खरे असेल तर ते बँकेच्या एका शाखेपुरतेच मर्यादित असेल.