शौक बडी चीज है !
#सीएम रीप
शौक करणे हा मानवी स्वभावाचा अविभाज्य घटक आहे. एखादी गोष्ट मनात आली आणि ती करता आली नाही तर संबंधित व्यक्तीला शांत बसवत नाही. मग आपली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती वाटेल तेवढे कष्ट उपसायला तयार होते, वाटेल तेवढ्या खस्ता खात असते. असाच एक प्रकार सध्या चर्चेत आला आहे. विमानात बसायचे स्वप्न पूर्ण करता आले नाही म्हणून कंबोडियातील एका माणसाने चक्क विमानाच्या आकाराचेच घर शेतात बांधले आहे.
कंबोडियातील चार्च पेउ हा एक बांधकाम मजूर आहे. कधीतरी आयुष्यात आपणही विमानात बसून प्रवास करायचा, असे त्याचे स्वप्न होते. मात्र दुर्दैवाने हे काही साध्य झाले नाही. म्हणून पेउने विमानाच्या आकाराचे एक घर स्वतःच्या शेतात बांधले आहे. पेउ कंबोडियातील सीएम रीप गावात वास्तव्यास आहे. तिथे त्याने हे विमानाच्या आकाराचे घर बांधले आहे. २० हजार डॉलरचा खर्च करून त्याने त्याच्या भाताच्या शेतात हे घर बांधले आहे. त्याची पत्नी, तीन मुले आणि तो स्वतः इथे राहतात. २० हजार डॉलर जमवण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आहेत. आयुष्यभराची पुंजी या घराच्या बांधकामासाठी खर्च केली आहे.
स्वतःला कधीही विमान जवळून पाहायला मिळाले नाही. मात्र त्याने त्याचे घर हुबेहूब विमानासारखे बांधले आहे. यासाठी त्याने विमानबांधणी या विषयावरील हजारो व्हीडीओ अभ्यासले आहेत. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याने ३० वर्षांपासून पैसे जमवले. चार्च पेउ सांगतो, आता माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. याचा आनंद जास्त आहे. आता या विमानात मी राहू शकतो, झोपू शकतो, स्वयंपाक बनवू शकतो. हे माझ्या मालकीचे विमान असल्याचा आनंद अनमोल असल्याचे त्याने नमूद केले आहे.वृत्तसंस्था