शेख हसीना यांच्या 'त्या' शब्दाने लोक पेटून उठले; लोकांचा धुडगूस सुरू, जाणून घ्या बांगलादेशात काय चाललंय

पंतप्रधान शेख हसीना भारतात पळून आल्या. त्यानंतर त्यांच्या घराचा, रस्त्यांचा ताबा आंदोलकांनी घेतला. त्यांच्या घरातील वस्तू लोक पळवून नेताना दिसतायेय. तर कोणी त्यांच्या बेड वर झोपून फोटो काढतंय.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Tue, 6 Aug 2024
  • 05:12 pm
Sheikh Hasina, Bangladesh, Dhaka, Protest, Reservation, Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान शेख हसीना भारतात पळून आल्या. त्यानंतर त्यांच्या घराचा, रस्त्यांचा ताबा आंदोलकांनी घेतला. त्यांच्या घरातील वस्तू लोक पळवून नेताना दिसतायेय. तर कोणी त्यांच्या बेड वर झोपून फोटो काढतंय. एकाने तर थेट हसीना यांची साडी नेसल्याचं दिसत आहे. एक जण त्यांचा हसीना यांचा ब्लाऊज हवेत भिरकावत आहे. हसीना यांच्या घराची जाळपोळ झाली.  लोक अक्षरश: पंतप्रधानाच्या निवासस्थानी धुडगूस घालतायेत. देशात पोलिस स्टेशन्स वर हल्ले होत आहे. कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार बांगलादेशात उरल्याचं दिसत नाही. आरक्षण नको या एका मुद्द्यावरून सुरू असलेलं आंदोलन पंतप्रधान शेख हसीना यांच्या पायउतार होणं आणि पळून जाण्यापर्यंत येऊन ठेपलं आहे.

शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य असलेलं  विमान  दिल्लीलजवळच्या गाझियाबादच्या हिंडन हवाईतळावर उतरलं. इतिहासाची पुरावृत्ती झाली आणि शेख हसीना यांना ४९ वर्षानंतर पुन्हा भारतात आश्रय घेणं भाग पडलं.

बांगलादेश हा भारताचा शेजारी. दक्षिण आशियातील अतिशय महत्त्वाचा देश. शेख हसीना आणि त्यांचा आवामी लीग हा पक्ष यांच्याशी भारताचे गोडव्याचे संबंध. याचा अर्थ असा की जोपर्यंत अवामी लीगची बांगलादेशात सत्ता असेल तेवढ्या काळापुरतं भारत आणि बांग्लादेश संबंध चांगले. आता शेख हसीना पळून भारतात आल्या आहेत. मागील काही वर्षापासून तुरुंगात असणाऱ्या  बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीच्या अध्यक्षा खालिदा झिया यांची तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्णय आर्मीने घेतला आहे.  बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी पक्ष शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचा प्रमुख विरोधक आहे. खालिदा यांना हसीना यांचं कट्टर विरोधक मानलं जातं. 

दुसरीकडे बांगलादेशात जे सुरू आहे, तो बांगलादेशचा अंतर्गत प्रश्न आहे आणि भारत त्यात ढवळाढवळ करणार नाही असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं. भारताच्या या भूमिकेवर बांगलादेशातल्या ग्रामीण बँकचे प्रणेते आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले भारताची ही भूमिका वेदनादायी आहे. भावाच्या घरात आग लागली, तर त्याला आपण अंतर्गत प्रश्न कसं म्हणू शकतो? असा प्रश्न त्यांनी केला. 

एक गोष्ट मात्र नक्की भारताला या सगळ्यांपासून अलिप्त राहणं शक्य नाही.  भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि अंतर्गत सुरक्षेवर याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यादृष्टीनेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शेख हसीना यांची भेट घेतली. तर पंतप्रधान मोदींनी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतली. शेख हसीना यांनी लंडनमध्ये आश्रय मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तिथूनही त्यांना नकार आल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील काही काळ तरी त्या भारतातच सुरक्षित ठिकाणी राहणार हे निश्चित. 

बांगलादेश का पेटला?
१९७१ मधल्या बांगलादेश  स्वातंत्र्य युद्धातल्या सैनिकांच्या मुलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये १९७२ पासून ३०% आरक्षण जाहीर करण्यात आलं. २०१८ मध्ये शेख हसीना सरकारनं हे आरक्षण रद्द केलं. मात्र जून २०२४ मध्ये आरक्षण पुन्हा लागू करण्याचा आदेश कोर्टाने दिला. त्यामुळे बांगलादेशात तीव्र आंदोलन सुरू झालं. ढाका आणि इतर मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. स्वातंत्र्य सैनिकांच्या तिसऱ्या पिढीला आरक्षणाचा लाभ का? असा सवाल विचारला जाऊ लागला. हे आरक्षण भेदभाव करणारं असून नोकरी ही  मेरिटच्याच आधारावर मिळावी अशी मागणी होऊ लागली. त्यातच शेख हसीना यांनी आंदोलकांबद्दल  रझाकार हा शब्द वापरला आणि परिस्थिती अजूनच चिघळली. 'रझाकार' हा शब्द १९७१ मध्ये पाक लष्कराला मदत करणाऱ्यांसाठी वापरला जातो. हिंसाचार वाढला. विद्यार्थ्यांच्या या हिंसक आंदोलनात  ३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला.

आता ज्यांच्या एका व्यक्तव्यावरून संपूर्ण बांग्लादेश पेटून उठला त्या शेख हसीना यांच्याबद्दल जाणून घेऊ.
शेख हसीना यांचा जन्म २८  सप्टेंबर १९४७ ला झाला. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांच्या कन्या. विद्यार्थीदशेतच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. अवामी लीगच्या  विद्यार्थी विंगचं काम त्यांनी सांभाळलं. १९७५ साली लष्कराने हसीना यांच्या कुटुंबाविरोधात मोर्चा उघडला. त्यामध्ये हसीना यांचे आई-वडील, तीन भावांची लष्कराकडून हत्या करण्यात आली. त्यामुळे त्या देशातून निघून गेल्या. काही काळ त्या जर्मनीत राहिल्या. पुढे इंदिरा गांधी यांनी त्यांना भारतात त्यांना आश्रय दिला. सहा वर्षे निर्वासित आयुष्य जगून त्या पुन्हा बांग्लादेशात परतल्या. १९८६ साली निवडणुका झाल्या. या काळात त्यांनी अवामी लीगचं पक्षकार्य सांभाळलं. पुढे १९९६ साली त्या बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या.

आई पुन्हा राजकारणात परतणार नाही
पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर शेख हासीना यांच्या मुलगा साजीब वाजेद याने प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.  शेख हसीना या वयाच्या सत्तरीत असून देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी त्यांनी एवढे परिश्रम घेऊनही लोकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं. त्या खूप निराश असून हसीना यांचं संपूर्ण कुटुंब आता कंटाळलंय. गेल्या १५ वर्षात हसीना यांनी देशाचा कायापालट केला. बांग्लादेश हा गरीब देश होता. हसीना यांच्या प्रयत्नांमुळेच आज देश आशियातील मोठी शक्ति आहे. शेख हसीना या प्रचंड निराश झाल्या असून आता त्या राजकारणात परतण्याची काहीही शक्यता नसल्याचं ते म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest