शरीफ-भुट्टो यांचे अखेर ठरले!

शाहबाज पंतप्रधान तर असिफ झरदारी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Thu, 22 Feb 2024
  • 01:17 pm
Sharif-Bhuttofinallydecided!

शरीफ-भुट्टो यांचे अखेर ठरले!

#इस्लामाबाद  

पाकिस्तानमध्ये सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ८ फेब्रुवारीला पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल लागले होते. निकालात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने  सत्तेवर कोण येणार याचा तिढा कायम होता. अखेर १५ दिवसांच्या चर्चेनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (पीएमएल-एन) यांच्या युतीचे सरकार बनताना दिसत आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावर भुट्टो जरदारी यांनी दोन्ही पक्षातील आघाडीची घोषणा केली. ते म्हणाले की, पाकिस्तान मुस्लीम लीगचे -(नवाझ गट) अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान स्विकारण्यास मान्हन्तयता दिली आहे. पीपीपीचे उपाध्यक्ष आसिफ झरदारी देशाचे नवे राष्ट्रपती बनतील. दोन्ही पक्षांमधील दीर्घ चर्चेनंतर मंगळवारी रात्री उशीरा संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये येत्या काही दिवसात नवे सरकार सत्तेवर आल्याचे  पाहायला मिळू शकते.

पीपीपी आणि पीएमएल-एनने सत्तेवर येण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ मिळवले आहे. त्यामुळे ते आता सरकार स्थापनेच्या स्थितीत आले आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआयला समर्थन देणारे अपक्ष विजयी उमेदवार आणि सुन्नी इत्तेहाद काऊंसिल (एसआयसी) यांनी आधी बहुमत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले. त्यानंतर सरकार स्थापनेचा नवा फॉर्म्युला समोर आला.

पत्रकार परिषदेत बोलताना शहबाज शरीफ यांनी दोन्ही पक्षांनी सकारात्मक चर्चा केल्याबद्दल आभार मानले. दोन्ही पक्ष एकजुटीने सरकार स्थापन करतील असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नव्या सरकार स्थापनेच्या दिशेने पाऊल पडले आहे. 

शाहबाज यांच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणती मंत्रिपदं दिली जातील, याचा तपशील नंतर जाहीर केला जाईल असे झरदारी यांनी सांगितले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे निवडणूक लढवण्यावर बंदी असलेल्या पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांचा गट या निवडणुकीत सर्वांत मोठा गट म्हणून समोर आला होता. 

या निवडणुकीत पाकिस्तानमध्ये पीएमएम-एन पक्षाला ७५ जागा मिळाल्या, तर पीपीपीला ५४ जागा मिळाल्या. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान एमक्यूएम-पी पक्षाला १७ जागा मिळाल्या आहेत. या पक्षाने पीपीपी आणि पीएमएल-एन युतीला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest