माहिती विकणे मेटाला पडले महागात
#ब्रुसेल्स
फेसबुकची मातृसंस्था असलेल्या मेटाला युरोपियन युनियनने चांगलाच दणका दिला आहे. इतर देशांमधील फेसबुक-इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांची माहिती अमेरिकेत पाठवल्यामुळे मेटाला थोडाथोडका नाही तर तब्बल १० हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच माहिती हस्तांतरण थांबवण्यासाठी मेटाला पाच महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या देशांतील नागरिकांची माहिती जर मेटा अमेरिकेस देत असेल, तर ती माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या हाती देखील लागू शकते. या भीतीमुळेच यापूर्वीही मेटाला ही माहिती अमेरिकेत न नेण्याची ताकीद देण्यात आली होती. त्यानंतर आता करण्यात आलेल्या कारवाईमुळे मार्क झुकरबर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे.
युरोपच्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी २०२० साली युरोपियन युनियन ते अमेरिका माहिती हस्तांतरणाला अवैध ठरवले होते. त्यानंतर गेल्या वर्षी माहिती न देण्याची ताकीद देण्यात आली होती. त्यानंतर युरोपात काही काळ फेसबुकची सेवा ठप्प देखील करण्यात आली होती.
यापूर्वीही झाला आहे दंड
यावर्षी जानेवारीमध्ये देखील मेटावर व्हॉट्सॲप या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने केलेल्या माहितीच्या सुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे कारवाई करण्यात आली होती. आयर्लंडच्या नियामकाने मेटावर अतिरिक्त ५.५ मिलियन युरो, म्हणजेच सुमारे ४७.८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. एवढेच नव्हे, तर इन्स्टाग्राम आणि फेसबुकने नियमांचे केलेले उल्लंघन पाहता युरोपियन युनियनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेटाला ३९० मिलियन युरोंचा दंड भरण्याचे आदेश दिले होते. सोमवारी (२२ मे) युरोपियन युनियनने मेटाला १०,७६५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. यासोबतच कंपनीला इतर आदेशही दिले. मेटाला अमेरिकेत होणारे माहितीचे हस्तांतरण थांबवण्यासाठी पाच महिन्यांची, तर अमेरिकेत माहिती साठवून ठेवणे थांबवण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, हा निर्णय सदोष आणि अन्यायकारक असल्याचे मत मेटाकडून व्यक्त करण्यात आले. तत्काळ बंदी घालण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी आम्ही करणार आहे. या निर्णयामुळे दररोज फेसबुक वापरणाऱ्या लाखो लोकांचे नुकसान होईल, असे मेटाचे जागतिक व्यवहार विभागाचे अध्यक्ष निक क्लेग म्हणाले. युरोपियन युनियनने यापूर्वी गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी अमेझॉन या कंपनीवरही कारवाई केली होती. अमेझॉनला तेव्हा ७४६ मिलियन युरोंचा दंड ठोठावण्यात आला होता. मेटावरील आजच्या कारवाईने हा विक्रम मोडला आहे.वृत्तसंस्था