‘आपल्या देशात काय घडते आहे ते पाहा’

जी-७ राष्ट्रांच्या बैठकीत करण्यात आलेल्या टीकेमुळे चीनचा जळफळाट झाला असून चीनने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सुनावले आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा ब्रिटनने आपल्या राजकीय आणि आर्थिक समस्या निवारणावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला चीनने सुनक यांना दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Admin
  • Tue, 23 May 2023
  • 12:51 pm
‘आपल्या देशात काय घडते आहे ते पाहा’

‘आपल्या देशात काय घडते आहे ते पाहा’

जी-७ शिखर परिषदेत झालेल्या टीकेने चीनचा जळफळाट; परराष्ट्र मंत्रालयाने सुनक यांना सुनावले खडे बोल

#बीजिंग

जी-७ राष्ट्रांच्या बैठकीत करण्यात आलेल्या टीकेमुळे चीनचा जळफळाट झाला असून चीनने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सुनावले आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा ब्रिटनने आपल्या राजकीय आणि आर्थिक समस्या निवारणावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला चीनने सुनक यांना दिला आहे.  

हिरोशिमा येथील जी-७ राष्ट्रसमूहाच्या बैठकीत चीनच्या विस्तारवादी धोरणावर टीका करण्यात आली आहे. विशेषतः ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी, आजच्या काळात चीन हा जागतिक शांतता आणि विकासातील मोठा अडसर असल्याचे विधान केले आहे. सुनक यांच्या विधानाला अन्य देशांच्या प्रमुखांनी समर्थन दिले आहे. त्यामुळे चीनचा संताप झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ब्रिटनने नाहक चीनची बदनामी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात चीनची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही सुनक यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करतो. ब्रिटनच्या नेत्यांनी निष्कारण चीनवर आगपाखड करण्यापेक्षा आपल्या देशातील प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असा आग्रह आम्ही नेहमीच धरत आलेले आहोत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुनक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ब्रिटनवर तोंडसुख घेतले आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या देशाची आर्थिक अवस्था काय आहे, ती समस्याच कशी सोडवता येईल, याचा विचार अधिक केला तर बरे होईल, आपल्या आर्थिक आणि राजकीय समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा चीनची बदनामी करण्याने काय भले होणार आहे, असा सवालही चीनने उपस्थित केला आहे.

जपानच्या राजदूतालाही दिली समज

जी-७ शिखर परिषदेत चीनच्या विस्तारवादी धोरणावर कडाडून टीका करण्यात आली. तसेच दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या अतिक्रमणाविरोधातही बरीच चर्चा झाली. या चर्चेत सहभागी झालेल्या जपानने चीनमुळे दक्षिण चिनी समुद्रात तणाव वाढत असून शेजारील देशांना चीनच्या दडपशाहीचा जाच सहन करावा लागत असल्याची तक्रार केली आहे. जपानच्या या टीकेबाबत संतापलेल्या चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच जी-७ िशखर परिषदेत करण्यात आलेल्या टीकेबाबतचा खुलासा मागवण्यासाठी चीनमधील जपानच्या राजदूतांकडे निरोप पाठवला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आमची बदनामी करण्यासाठी जपानने आमच्या अंतर्गत मुद्यांत हस्तक्षेप केलेला आहे. एवढेच नाही तर जपान आणि चीन यांच्यात झालेल्या सहकार्य कराराचा, गोपनीयतेच्या नियमाचाही जपानने भंग केला आहे. हे आम्ही कदापिही सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया चीनचे परराष्ट्र राज्यमंत्री सन वेइ डाँग यांनी जपानच्या राजदूतांकडे व्यक्त केली आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story