रशियाच्या विमानांनी केला चुकून आपल्याच शहरावर हल्ला
#मॉस्को
रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर असलेल्या बेलगोराड शहरावर सातत्याने बॉम्बहल्ले होत असून या हल्ल्यांना युक्रेनचे लष्कर जबाबदार असल्याचे तेथील नागरिक सांगत होते. गुरुवारी मध्यरात्री बेलगोराडच्या नागरिकांना अशीच मध्यरात्री जाग आली तेव्हा त्यांना युक्रेनच्या हवाई दलाने हल्ला केला असेच वाटले. मात्र, हा हल्ला आपल्याच लष्करी विमानांनी केल्याचे रशियन लष्कराच्या लक्षात आले. हा हल्ला अपघाताने झाला होता.
बेलगोराड हे साधारण तीन लाख ४० हजारांच्या वस्तीचे सीमेवरील शहर असून ते सीमेपासून पूर्वेला ४० कि. मी. अंंतरावर आहे. गुरुवारी रात्री झालेला स्फोट हा नेहमीच्या स्फोटापेक्षा अधिक शक्तिशाली होता. ही घटना प्रत्यक्ष ज्यांनी पाहिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटापूर्वी प्रथम एक जोरदार आवाज आला. त्यानंतर स्फोटामुळे अपार्टमेंट हलताना दिसत होते. एका ठिकाणी तर रस्त्यावरील कार जवळच्या दुकानाच्या छतावर फेकली गेली. स्फोटामुळे साधारण २० मीटर रुंदीचा एक खड्डा काही अपार्टमेंटच्या मध्यभागी पडला होता. स्फोटामुळे अनेक अपार्टमेंटच्या खिडक्या हलत होत्या, तसेच अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या स्फोटात दोघेजण जखमी झाले तर एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर रशियन लष्कराने प्रथम युक्रेनला जबाबदार धरले. तसेच हल्ल्यासाठी कशाचा वापर केला असावा यावरही विविध अंदाज व्यक्त केले गेले. अनेकांनी याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची भाषा वापरली. तासाभरानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्याच एसयू-३४ बॉम्बर विमानाकडून अपघाताने हा हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली. याबाबत अधिक तपशील दिला नसला तरी हा किमान पाचशे कि. ग्रॅ. वजनाचा बॉम्ब असावा असा अंदाज आहे.
वृत्तसंस्था