भारतासोबत रशिया करणार मुक्त व्यापार
#मॉस्को
युक्रेनसोबतचे युद्ध आणि आर्थिक निर्बंध लादले गेल्यानंतर भारतासोबतच्या कच्च्या तेलाच्या व्यापारामुळे पाश्चिमात्य देशांच्या निशाण्यावर आलेल्या रशियाने भारतासोबतचे मित्रत्व अधिक वृद्धिंगत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रशिया भारतासोबत लवकरच मुक्त व्यापार करार करणार असून संरक्षण, तंत्रज्ञान, आण्विक ऊर्जानिर्मिती, अवकाश संशोधन अशा अनेक विषयांवर भारतासोबत बोलणी सुरू असल्याचे रशियाने म्हटले आहे.
भारत आणि रशिया हे देश मुक्त व्यापार करार आणि आर्थिक गुंतवणुकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. कोविड संक्रमणामुळे भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्यासाठीची बोलणी लांबणीवर पडली होती. मात्र आता हे दोन देश आर्थिक, संरक्षण, आण्विक ऊर्जा, अवकाश इत्यादी क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्याबाबत एक पाऊल पुढे टाकत असल्याचे रशियाने सोमवारी स्पष्ट केले आहे.
रशियाचे उप पंतप्रधान डेनिस मनतुरोव हे सध्या भारत भेटीवर आहेत. सोमवारी डेनिस भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते भारत-रशियातील एकूण द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे.
दरम्यान रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाशी व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशावरही आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा पाश्चिमात्य देशांनी दिला आहे. मात्र अशा अवस्थेत जगभरातून रशियाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू असताना भारताने रशियाकडून तेलखरेदी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या या निर्णयामुळे रशियाला मोठा दिलासा मिळाला आहे.
रशिया आपल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवाचा आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील उत्पादनांचा लाभ भारताला देण्यास तयार होता. मात्र या करारासाठी आवश्यक व्यवहार कोणत्या चलनात केला जावा, याबाबत चर्चा होणे बाकी होते. मात्र आता रशिया डॉलरमध्ये व्यवहार करणाऱ्या देशांच्या समूहाचा सदस्य राहिलेला नाही. त्यामुळे हा व्यवहार रशियन अथवा भारतीय चलनात होण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयातर्फे
सांगण्यात आले आहे.वृत्तसंस्था