एका दिवसात रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतो
#वॉशिंग्टन
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीतील डाव्या-प्रतिदाव्यांनी वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. रिपब्लिकन पक्षाकडून आपला दावा सांगणारे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, रशिया-युक्रेन युद्धाचे परिवर्तन तिसऱ्या महायुद्धात होऊ शकते, अशी शक्यता वर्तवत हे युद्ध आपण एका दिवसांत थांबवू शकत असल्याचा दावा शनिवारी (४ फेब्रुवारी) केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पक्षातील त्यांच्या दावेदारीला कितपत बळ मिळेल, हे येत्या काळात समोर येईल.
सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्याला आणखी एक टर्म मिळावी, असे सांगत पक्षाकडे आपला दावा सांगितला आहे. तर सत्ताधारी पक्षाने राष्ट्राध्यक्षपदासाठी नव्या दमाचे उमेदवार शोधून ठेवले आहेत. या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दा प्रचारात वापरायला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी शनिवारी 'कंझर्वेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्स'मध्ये केलेल्या भाषणादरम्यान हे विधान केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी १०० मिनिटांचे भाषण केले. रशिया-युक्रेन युद्ध वेळेवर न संपल्यामुळे तिसऱ्या महायुद्धाबाबतही ते बोलले. मात्र, आपण असे होऊ देणार नसल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. ट्रम्प म्हणाले, युद्ध सोडवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी माझी चांगली भेट होईल आणि ते माझे नक्कीच ऐकतील. अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार न घेतल्यामुळे ऑगस्ट २०२१ मध्ये रशियाचे व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला, असेही ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले आहे. त्वरित निर्णय घेतले नाहीत तर तिसरे महायुद्ध पाहायला मिळणार आहे. मात्र, मी एकमेव उमेदवार आहे जो हे तिसरे महायुद्ध थांबवू शकतो. मी ओव्हल ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी रशिया आणि युक्रेनमधील विनाशकारी युद्ध संपवून टाकेन. तिथे काय बोलावे ते मला चांगले माहीत आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी बायडेन प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली. आपल्या देशाच्या इतिहासातील ही सर्वात धोकादायक वेळ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
वृत्तसंंस्था