आर्थिक निर्बंधांनंतरही रशियाचा नफा कायम
#मॉस्को
रशियाने युक्रेनसोबत सुरू केलेल्या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या युद्धामुळे जगभरातील देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रशियाच्या निर्यातीतील उत्पन्नावर फारसा फरक पडलेला नाही. कारण या संधीचा लाभ घेत भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. आजमितीस भारत रशियाकडून प्रतिदिवशी १६.२० लाख बॅरल कच्चे तेल आयात करत आहे. भारत एवढ्या मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करेल, याचा अंदाज रशियालाही नव्हता. त्यामुळे तेलाच्या निर्यातीमुळे रशियाचे आर्थिक नुकसान टळले आहे. भारताखेरीज चीन व इतर काही देशांना रशिया कच्च्या तेलाचा पुरवठा करत आहे.
अमेरिका आणि युरोपियन युनियनने घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था कोलमडेल. त्यामुळे रशिया युक्रेनवरील आक्रमण थांबवून निमूटपणे शरणागती पत्करेल, असा अंदाज पाश्चिमात्य देशांनी लावला होता. रशियाविरुद्ध युक्रेनला पाठबळ पुरवणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या लष्कराचे नियोजनही त्यावरच अवलंबून होते. मात्र या संधीचा लाभ उठवत भारताने रशियाकडून तेल खरेदीचा सपाटा लावला आणि अमेरिकेसह सर्वच मित्रदेशांनी लावलेल्या आर्थिक निर्बंधांची परिणामकारकता कमी केली. भारत नेहमीच कच्च्या तेलाची आयात करतो. भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सौदी अरबकडून होतो. मात्र भारताने सौदीकडून आजवर खरेदी केलेल्या कित्येकपटीने जास्त तेल रशियाकडून खरेदी केले आहे.
सौदी अरबकडून आजवर पुरवण्यात आलेल्या कच्च्या तेलाच्या एक त्रृतीयांशपेक्षा जास्त कच्चे तेल रशियाने भारताला पुरवले आहे. भारताने रशियाचा अपवाद वगळता अन्य निर्यातदारांकडून तेलखरेदी बंद केली आहे. रशियासाठी मागच्या पाच महिन्यांपासून भारत हाच एकमेव मोठा तेल खरेदीदार ठरला आहे.
रशिया-युक्रेन युद्धापूर्वी भारताचे रशियाकडून तेलखरेदीचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी होते. आजमितीस ते ३६ टक्क्यांवर गेले आहे. भारताने रशियाकडून तेलखरेदी केल्याचा फटका आजवर भारताला कच्चे तेल विकणाऱ्या सौदी अरब आणि अमेरिकेला बसला आहे.
वृत्तसंंस्था