रेवडी कल्चरने केला पाकिस्तानचा घात
#इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारकडे नित्याचा खर्च भागवण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. त्यात देशांतर्गत राजकीय परिस्थिती चिघळत चालली आहे. सर्व प्रकारचे अनुदान बंद केले तरच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला नव्याने कर्ज देणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी अनुदान देत बसल्यानेच पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला पोहचली असल्याचे नाणेनिधीने स्पष्ट केले आहे. त्यात सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्याने शरीफ सरकारला अनुदान बंद करणे परवडणार नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकारची कोंडी झाली आहे.
जागतिक बँकेने पाकिस्तान सरकारला राजकोषात झालेली घट आणि देशाच्या डोक्यावरील वाढलेला कर्जाचा आकडा यासाठी हे रेवडी कल्चर कारणीभूत ठरले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाकिस्तानला नव्याने कर्ज हवे असल्यास सर्व प्रकरचे अनुदान त्वरित बंद करण्याचा आग्रह पाकिस्तान सरकारकडे धरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ त्यामुळे धर्मसंकटात अडकले आहेत. पैसे हवे असतील तर अनुदान बंद करावे लागणार आणि निवडणूक जिंकायची असेल तर अनुदान द्यावेच लागणार, अशा अवस्थेत पाकिस्तानमधील अंतर्गत संघर्ष अधिक वेगाने उफाळून येत आहे.
सगळीकडेच सरकारची नाचक्की
पंजाब आणि खैबर पख्तुनवा प्रांताच्या निवडणुकांसाठी निधी नसल्याने िनवडणूक लांबणीवर टाकण्याची सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक निधी उभारण्यासाठी पंतप्रधान शरीफ यांनी संसदेत मांडलेला निधी संकलनाचा प्रस्तावही लोकसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला आहे. तीन दिवसांत काहीही करून निवडणूक आयोगाकडे निधी हस्तांतरीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान सरकारला पैसे देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. टाळाटाळ करून वेळ मारून नेण्याचे सर्व प्रयत्न फसले आहेत.
वृत्तसंस्था