Britain : ब्रिटनच्या उपपंतप्रधान पदाचा राजीनामा

आपल्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागलेले ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वादामुळे राजीनामा द्यावा लागलेले पंतप्रधान ऋषी सुनक मंत्रिमंडळातील हे पहिले ज्येष्ठ मंत्री आहेत. चौकशीमध्ये आपल्यावरील आरोप नाकारले असले तरी त्यातील दोन दाव्यांत तथ्य असल्याचे मत नोंदवले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 22 Apr 2023
  • 06:14 am
ब्रिटनच्या उपपंतप्रधान पदाचा राजीनामा

ब्रिटनच्या उपपंतप्रधान पदाचा राजीनामा

कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी चौकशी समितीला दोन प्रकरणात आढळले तथ्य

#लंडन

आपल्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागलेले ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वादामुळे राजीनामा द्यावा लागलेले पंतप्रधान ऋषी सुनक मंत्रिमंडळातील हे पहिले ज्येष्ठ मंत्री आहेत. चौकशीमध्ये आपल्यावरील आरोप नाकारले असले तरी त्यातील दोन दाव्यांत तथ्य असल्याचे मत नोंदवले आहे.

राब म्हणतात की, चौकशी करणाऱ्या सदस्यांनी मी कोणावरही ओरडलेलो नाही किंवा धमकावलेले नाही हे मान्य केले आहे. त्यामुळे कोणालाही हेतूपूर्वक काही फेकून मारणे किंवा शारीरिक मारहाण, दुखापत करण्याचा प्रश्नच येत नाही. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना माझ्याकडून कामावेळी अवमानकारक वागणूक दिली गेली असल्यास त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. मात्र, त्यामागे कोणत्याही हेतूने अशी वागणूक दिलेली नाही हे मला स्पष्ट करावयास आवडेल. कामाच्या तणावाखाली अशी वागणूक दिली जाऊ शकेल. मात्र, त्यामागे जाणीवपूर्वक अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. कायदा मंत्रालयात आव्हानात्मक स्थितीत वेगाने काम करताना एक विशिष्ट दर्जा राखण्याचे काम आपण केले आहे.

वागणुकीबद्दल झालेल्या तक्रारीनंतर नोव्हेंबरमध्ये चौकशी करण्याची विनंती राब यांनी केली होती. त्यानंतर महिन्याने चौकशीची व्याप्ती वाढवून त्यात आणखी पाच तक्रारींचा समावेश केला गेला. सुनक यांनी राब यांचे प्रथम समर्थन केले होते. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. चौकशी अहवाल अजून सार्वजनिक केला नसल्याने सुनक यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest