Gaza War: राफावर छापा टाकत दोन ओलिसांची सुटका

राफा: इस्राएलच्या सैनिकांनी सोमवारी (१२ फेब्रुवारी) राफा शहरात अत्यंत नाट्यपूर्ण कारवाई करत हमासच्या ताब्यातील दोन ओलिसांची सुटका केली. ही कारवाई करताना इस्राएलने केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यात किमान

Israel Palestine Conflict

राफावर छापा टाकत दोन ओलिसांची सुटका

इस्राएलच्या हमासवरील हवाई माऱ्यात ६७ पॅलेस्टिनींचा मृत्यू, वाटाघाटीचा मार्ग आणखी खडतर

राफा: इस्राएलच्या सैनिकांनी सोमवारी (१२ फेब्रुवारी) राफा शहरात अत्यंत नाट्यपूर्ण कारवाई करत हमासच्या ताब्यातील दोन ओलिसांची सुटका केली. ही कारवाई करताना इस्राएलने केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यात किमान ६७ पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. हमासच्या ताब्यात जवळपास शंभर ओलिस असून त्यांची सुटका करण्याच्या इस्राएलच्या प्रयत्नांना आज थोडेसे यश आले आहे. मात्र, यामुळे शांतता कराराचा मार्ग आणखीनच खडतर झाला आहे.

इस्राएलने आज इजिप्तच्या सीमेला लागून असलेल्या राफा या शहरातील एका भागावर छापा टाकला. या शहरात जमिनीवरील कारवाई करण्याचे सूतोवाच इस्राएलने काही दिवसांपूर्वीच दिले होते. दक्षिण गाझामध्येच दाट लोकवस्तीत हमासचे दहशतवादी लपून बसले असून त्यांनी विविध ठिकाणी ओलिसांना लपवून ठेवले असल्याचा इस्राएलचा अंदाज आहे. राफा शहरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काही ओलिसांना ठेवले असल्याची माहिती इस्राएलला मिळाली होती. या इमारतीच्या चहूबाजूला आणि शेजारील इमारतींवरही हमासचे दहशतवादी तैनात होते. गुप्तपणे गेलेल्या इस्राएलच्या सैनिकांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास इमारतीची सुरक्षा भेदत आत प्रवेश केला आणि ओलिसांची सुटका केली. सैनिक इमारतीत घुसताच अनेक दहशतवाद्यांनी एकाच वेळी गोळीबार सुरू केला.

मात्र, सैनिकांनी ओलिसांभोवती संरक्षक कडे तयार करत प्रतिहल्ला केला. त्याचवेळी लढाऊ विमानांनीही परिसरात हल्ले करत जमिनीवरील सैनिकांना संरक्षण दिले. सुटका केलेल्या दोन ओलिसांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे, तर इस्राएलच्या हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. युद्धाला चार महिने उलटून गेल्यानंतरही हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका करण्यात यश न आल्याने इस्राएल सरकारवरील जनतेचा दबाव वाढला आहे. त्यातच, गाझा पट्टीतील ८० टक्के जनता दक्षिण गाझामध्येच एकवटली असल्याने येथे मोठी कारवाई न करण्याबाबतही त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. दुसरीकडे, शांतता करारासाठी प्रयत्न सुरू असतानाच ही कारवाई झाली असल्याने या करारासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिका, इजिप्तसारख्या मध्यस्थ देशांची अडचण झाली आहे.

बायडेन-अब्दुल्ला यांच्यात चर्चा

जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी मंगळवारी वॉशिंग्टन येथे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट घेतली. जॉर्डन हा इस्राएलचा शेजारी देश आहे. गाझा पट्टीतील संघर्ष थांबविण्यासाठी आणि ओलिसांची सुटका करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याबाबतच बायडन आणि अब्दुल्ला यांच्यात प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग होण्याची शक्यता असल्याने एफ-३५ लढाऊ विमानाचे सुटे भाग इस्राएलला निर्यात करण्यास नेदरलँडमधील न्यायालयाने येथील सरकारला मनाई केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest