रणसंग्राम २०२४: पवारांमधील ‘वर्ड वॉर’ जोरात

लोकसभा निवडणुकीचं वारं चांगलचं तापलं आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच थेट जुंपली आहे. निमित्त झालं ते शरद पवार यांच्याकडे गेलेल्या एका तक्रारीचं.

संग्रहित छायाचित्र

कुणी धमकावले असेल तर पोलिसांत केस करा, अजित पवारांचं शरद पवारांना आव्हानात्मक प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीचं वारं चांगलचं तापलं आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच थेट जुंपली आहे. निमित्त झालं ते शरद पवार यांच्याकडे गेलेल्या एका तक्रारीचं. त्यावर ‘‘कुणी धमकावले तर पोलिसांत केस करा,’’ असे प्रत्युत्तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी गटाकडून धमक्या मिळत असल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती. पवार हे सोमवारी (दि. ८) बारामती आणि पुरंदर तालुक्यांतील गावांच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. यावेळी सुपे येथील एका सभेत शरद पवार यांनी एक चिठ्ठी वाचून दाखवली. ‘‘घड्याळाला  मत दिलं नाही तर पाणी मिळणार नाही. तसेच कारखान्यात ऊसही घेतला जाणार नाही.’’ असे या चिठ्ठीत लिहिले होते. यावर ‘‘असल्या धमक्यांना घाबरू नका,’’ असंही शरद पवार यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत ठणकावून सांगितलं होतं. यावर ‘‘कोणी जर धमकावलं असेल तर सरळ पोलिसांत तक्रार करावी,’’ असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. ९) शरद पवारांना दिलं . बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीच्या निमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार यांच्यातील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी (गुढीपाडव्याच्या निमित्ताने बारामती दौऱ्यावर होते. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘‘लोक मला इतकी वर्षे ओळखतात. अशा पद्धतीने कुणी जर धमकावले असते, तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता. तसेच जर कुणी धमकावले असेल तर त्याच्या विरोधात पोलीस केस करावी, पोलीस त्याबाबतची कार्यवाही करतील,’’ असं आव्हानात्मक प्रत्युत्तर अजित पवार यांनी शरद पवार यांना दिलं.  संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीनेच चालवायची असते. राजकारण करताना राजकारणाच्याच पद्धतीने करायचे असते, असेदेखील अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकनाथ खडसेंचा भाजपात होणाऱ्या प्रवेशाबद्दल  विचारले असता, राजकारणात अशा घटना घडत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिलेला तसा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. तसा ते तो अधिकार बजावत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

पुरंदरला होणार महायुतीचा मेळावा

पुरंदरला येत्या गुरुवारी (दि. ११) महायुतीचा मेळावा होणार असून या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पुरंदरमध्ये कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार येत्या गुरुवारी तारखेला हा मेळावा होणार असून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि स्वत: मी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.’’ शिवतारे यांना दिलेल्या शब्दाला जागून आम्ही तिघेही पुरंदरमधील मेळाव्याला जाणार असून आम्ही बोलतो तसे वागतो, बदलत नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी उडवली ठाकरे गटाची खिल्ली

लोकांना पटेल असेच काही बोलावे, असा सल्ला संजय राऊत यांना अजित पवारांनी यावेळी दिला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘‘यावेळीची लोकसभेची लढाई ही नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे अशी आहे,’’ असे वक्तव्य केले होते. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता अजित पवारांनी मिश्किलपणे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला तरी खरंच असं वाटतं का? एक वेळ ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असं जरी ते म्हणाले असते तरी मान्य केले असते. पण ज्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या बाहेर नाही त्यांनी अशी विधाने करू नये. लोकांना पटेल असेच काही बोलावे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest