संग्रहित छायाचित्र
श्रीलंका भेटीवर असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची गुरुवारी रात्री भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. या भेटीत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. यावेळी ऊर्जा क्षेत्रात सहकार्य, बंदर पायाभूत सुविधा, विमान वाहतूक, आरोग्य, अन्न तसेच सुरक्षा, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्र आदींबाबत सहकार्याबाबत चर्चा केली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पारंपरिकपणे घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यावर उभय नेत्यांनी भर दिला. त्याचबरोबर भारत आणि श्रीलंका यांना जोडण्यासाठी सागरी सेतू बांधण्याची तयारी सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील प्रस्तावित भू-लिंक संदर्भातील अभ्यास अंतिम टप्प्यात आहे, असे यावेळी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले. यावेळी विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. जयशंकर यांनी पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांचीही भेट घेतली आणि भारताच्या भक्कम समर्थनाचा पुनरुच्चार केला.