राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांच्यासमोर पेन्स यांचे आव्हान
#आयोवा
'आव्हानात्मक व वेगळ्या काळासाठी आगळेवेगळे नेतृत्व' अशी घोषणा करत अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्याची घोषणा केली आहे. दोन दिवसांपूर्वीच पेन्स यांनी निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर त्यांच्या सहकाऱ्याचे आव्हान असणार आहे.
भिन्न काळासाठी भिन्न नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली आहे. पेन्स हे रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आयोवा राज्यातील 'द मॉइन' येथे आपला अधिकृत संदेश असलेला व्हीडीओ प्रसारित करून त्यांनी त्यांच्या ६४ व्या वाढदिवशी प्रचाराला सरुवात केली.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असतानाच पेन्स हे उपराष्ट्राध्यक्ष होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता माजी राष्ट्राध्यक्ष आणि उप राष्ट्राध्यक्षच एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून समोर आले आहेत. आपल्या या सर्वोत्तम देशाचे सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत, ते दिवस माझ्या नेतृत्वाखाली आणणार असल्याची ग्वाही पेन्स यांनी दिली आहे. प्रचार सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी फॉक्स न्यूज आणि ट्विटरवर हा व्हीडीओ प्रसारित करण्यात आला. आपल्या पक्षाला आणि आपल्या देशाला आपल्यातील अधिक चांगल्या गोष्टींना आकर्षित करणारा नेता हवा आहे, असा दावा त्यांनी केला. निष्क्रिय राहणे सोपे असते पण माझा तो स्वभाव नाही. त्यामुळे आज मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढत असल्याचे जाहीर करतो, अशी घोषणा त्यांनी केली. पेन्स हे सामाजिकदृष्ट्या सनातनी विचारांचे, सौम्य स्वभावाचे आणि अतिशय धार्मिक प्रवृत्ती असलेले नेते म्हणून ओळखले जातात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात लोकप्रिय विचारांना थारा देण्यास त्यांनी विरोध केला होता. आता त्यांना रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावान मतदार आणि इतर मतदार स्वीकारतात का याकडे निरीक्षकांचे लक्ष आहे.