सुदानमधील शांतता चर्चा निष्फळ
#खार्तूम
संघर्षग्रस्त सुदानमध्ये सैन्य (एसएएएफ) आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) या निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेला धक्का बसला आहे. आरएसएफ मानवतावादी शस्त्रविरामाचे वारंवार उल्लंघन करत असल्याचा आरोप करून सैन्याने चर्चेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.
सुदानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सौदी अरेबिया आणि अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. या दोघांच्या मध्यस्थीने एएसएफ आणि आरएसएफ यांनी २१ मे रोजी शस्त्रविरामाच्या करारावर सह्या केल्या होत्या.
सुदानची सत्ता ताब्यात घेण्यासाठी गेल्या महिन्यापासून जनरल अब्देल-फताह बुऱ्हान यांच्या नेतृत्वाखालील एएसएफ आणि जनरल मोहम्मद हमदान दागालो यांच्या नेतृत्वाखालील आरएसएफ यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत किमान ८६६ नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो जखमी झाले आहेत. प्रत्यक्षात मृतांचा आकडा यापेक्षा कितीतरी जास्त असल्याची शक्यता वैद्यकीय सेवा क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्याशिवाय किमान १४ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यातील किमान तीन लाख नागरिकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.
सुदान सैन्याचे प्रवक्ते ब्रि. नाबिल अब्दल्ला यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आरएसएफ मानवतावादी शस्त्रविरामाचे वारंवार उल्लंघन करत आहे. त्याबरोबरच त्यांनी राजधानी खार्तुममध्ये रुग्णालयांचा आणि इतर नागरी आस्थापनांचा ताबा घेतला आहे. त्याचा निषेध म्हणून सैन्य चर्चेतील सहभाग स्थगित करत आहेह्ण. पुढे काय पावले उचलायची यावर चर्चा करण्यापूर्वी अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने मान्य करण्यात आलेल्या शस्त्रविरामाच्या अटींचे संपूर्ण पालन झाले पाहिजे याची सैन्याला हमी हवी आहे, असे त्यांनी सांगितले.
शस्त्रविरामाच्या अटींनुसार, निवासी मालमत्ता आणि मानवतावादी मदतीची लूट थांबवण्याचे, तसेच रुग्णालये आणि विद्युतनिर्मिती केंद्रांसारख्या ठिकाणी आसरा न घेण्याचे दोन्ही गटांनी मान्य केले होते. आतापर्यंत सात वेळा शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक वेळी त्याचे उल्लंघन झालेले आहे आणि त्यासाठी दोन्ही गटांनी एकमेकांना जबाबदार ठरवले आहे.
आतापर्यंत ७००हून अधिक लोकांचा मृत्यू
सुदानच्या युद्धात आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यात १९० मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर १३ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. युनिसेफच्या म्हणण्यानुसार, १३ लाखाहून अधिक मुलांना त्वरित मदतीची गरज आहे. १५ एप्रिलपासून सुरू झालेल्या युद्धात लष्कराचे जनरल अब्देल फताह बुरहान किंवा पॅरामिलिटरी फोर्स कमांडर जनरल मुहम्मद हमदान दोघेही मागे हटण्यास तयार नाहीत. अनेकवेळा युद्धविराम जाहीर झाला पण दोघांमधील वादावर तोडगा निघाला नाही.
युद्धात अनाथाश्रमातील ६0 मुले ठार
सुदानची राजधानी खार्तूममध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला २ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, मायोग्मा नावाच्या अनाथाश्रमात ६० मुलांचा भुकेने आणि तहानने मृत्यू झाला आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या बालकांमध्ये ३ महिन्यांच्या नवजात बालकांचाही समावेश आहे. गेल्या दोन आठवड्यांत २६ मुलांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. खरे तर, लढाईमुळे सुदानमधील पुरवठा साखळी ठप्प झाली आहे. त्यामुळे लोकांना अन्न मिळणे दुरापास्त झाले आहे. अनाथाश्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मरणासन्न मुलांचे व्हिडीओ बनवून लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. व्हिडीओमध्ये पांढर्या कपड्यात गुंडाळलेले नवजातांचे मृतदेह दिसत आहेत.