'भाग बायडेन भाग'
#न्यूयॉर्क
सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडल्याने अमेरिकेतील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या बँकेच्या दिवाळखोरीचा फटका अमेरिकेबाहेरील गुंतवणूकदारांनाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडेही या घटनेबाबत बोलण्यासारखे काही नसल्याचे समोर आले आहे. एका पत्रकार परिषदेत ही बँक बंद कशामुळे पडली, हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे बायडेन यांनी पत्रकार परिषद सोडून निघून जाणे पसंत केले आहे.
या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी बायडेन सोमवारी (१३ मार्च) न्यूयॉर्क येथील सभागृहात आले होते. यावेळी पत्रकारांनी ही बँक बंद कशी काय पडली, ही बँक बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत, असे काही प्रश्न उपस्थित केले. तसेच सर्वसामान्य खातेदारांना तुम्ही कसा काय दिलासा देणार आहात, अशी विचारणा त्यांच्याकडे केली. या प्रश्नांची सरबत्ती ऐकून ज्यो बायडेन यांनी तिथून काढता पाय घेतला.
बायडेन बनले चेष्टेचा विषय
ज्यो बायडेन यांच्या पहिल्या टर्मबद्दल जनता नाराज आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेबाबत खातेदारांना दिलासा देण्यासाठी आलेल्या बायडेन यांनी पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून जाण्यामुळे ते आता चेष्टेचा विषय बनले आहेत. सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील १६ व्या क्रमांकाची मोठी बँक आहे, त्यामुळे बँक बुडाल्यावर खातेदारांना दिलासा देण्याचे कर्तव्य पार न पाडता पळ काढणारी व्यक्ती आम्हाला पुन्हा राष्ट्राध्यक्षपदावर नको, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. वृत्तसंस्था