पापुआ न्यू गिनीचे जेम्स मारापे आले चर्चेत
#पोर्ट मोर्सेबी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाकून पाया पडल्यामुळे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे सध्या भलतेच चर्चेत आले आहेत. पापुआ न्यू गिनी या लहानशा देशात भारतासारख्याच राजकीय घडामोडी घडत असतात. या कृष्णवर्णीय ख्रिश्चनबहुल देशाचे मारापे हे आजवरील सर्वात व्यवहारकुशल राजकारणी समजले जातात. कोविड महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी भारताने पापुआ न्यू गिनीला मोठ्या प्रमाणात लस पुरवली होती. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मारापे यांनी मोदींना एवढा आदर दाखवला असल्याची शक्यता आहे. याशिवाय स्वतःची प्रतिमा संवर्धन करण्यातही मारापे आघाडीवर असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (२२ मे) तिसऱ्या इंडो-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (एफआयपीआयपी) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पापुआ न्यू गिनीमध्ये आले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जेम्स मारापे यांनी स्वत: पंतप्रधान मोदींचे विमानतळावर येऊन स्वागत केले. मारापे यांनी प्रथम पंतप्रधान मोदींना मिठी मारली, नंतर चक्क वाकून त्यांच्या पायाला स्पर्श केला. याचा व्हीडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हीडीओसोबतच पंतप्रधान जेम्स मारापे हे देखील चर्चेत आले आहेत.
जेम्स मारापे (वय ५२ वर्षे) हे २०१९ पासून पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान आहेत. ते पांगू पाटी या राजकीय पक्षाचे सर्वात शक्तिशाली नेते आहेत. मारापे हे पापुआ न्यू गिनीचे आठवे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाची मंत्रिमंडळातील पदे भूषवली आहेत. यापूर्वी ते नॅशनल पीपल्स काँग्रेसचा एक भाग होते. परंतु २०१९ मध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. २०२० मध्ये त्यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता, परंतु सरकार पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला. १० नोव्हेंबर २०२० रोजी पापुआ न्यू गिनीच्या संसदेत मारापे यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता. मात्र, मारापे यांनी आपल्या राजकीय कौशल्याने विरोधकांचा हा प्रस्ताव हाणून पाडला. पापुआ न्यू गिनीचे संसद सदस्य दोन गटात विभागले गेले होते. ११० खासदार असलेल्या संसदेत ५५ खासदार विरोधी गटासोबत होते, तर ५३ खासदार जेम्स मारापे यांच्यासोबत होते, तर दोन सदस्यांपैकी एक सभापती व दुसरा उपसभापती होता. जेम्स मारापे यांनी सभापतींना आपल्या बाजूने वळवून घेत अर्थसंकल्प मंजूर करून घेतला होता.वृत्तसंस्था