Pakistan: पाकमध्ये पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये (Pakistan) सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस राहिले असताना सोमवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी एका पोलीस ठाण्याला लक्ष्य करत ग्रेनेडने हल्ला केला.

Pakistan

संग्रहित छायाचित्र

सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील दुर्घटना, पोलीस स्टेशनही असुरक्षित, हल्ल्यात १० पोलीस ठार

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये (Pakistan) सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस राहिले असताना सोमवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी एका पोलीस ठाण्याला लक्ष्य करत ग्रेनेडने हल्ला केला. ज्यामध्ये १० पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांतातील दरबन शहरातील एका पोलीस ठाण्यावर सोमवारी सकाळी दहशतवादी हल्ला करण्यात आला.

पाकिस्तानात निवडणूक आणि हिंसाचार यांचे समीकरण बनलेले आहे. येत्या ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. पाकिस्तान पोलिसांनी सोमवारी सांगितले की, खैबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात किमान दहा पोलीस ठार झाले आहेत, तर सहा जण जखमी झाले आहेत. पहाटे तीन वाजता दरबन तहसीलमधील पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह हल्ला केला. जखमींना जिल्ह्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी चारही बाजूंनी ग्रेनेडने पोलीस ठाण्यावर हल्ला केला आणि जोरदार गोळीबार केला. या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले परंतु दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलीस दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, 'द न्यूज इंटरनॅशनल' या वृत्तपत्राने अलीकडेच पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त दिले आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात देशात ९३ दहशतवादी हल्ले झाले, ज्यात ९० लोक मारले गेले तर १३५ जखमी झाले. या व्यतिरिक्त, जानेवारी २०२४ मध्ये १५ जणांचे अपहरण झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांत अतिशय अशांत मानले जातात आणि या दोन्ही प्रांतांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. मात्र, बलुचिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण गेल्या आठवड्यातही कराचीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानमध्ये तीन दहशतवादी हल्ले झाले, ज्यामध्ये चार सरकारी कर्मचारी आणि दोन नागरिक ठार झाले होते. यानंतर पाक सुरक्षा दलाने चकमकीत नऊ दहशतवाद्यांना ठार केले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest