पाकिस्तानच्या उलट्या बोंबा
#कराची
भारत हा शेजारील देशांसोबत वर्तन करताना आक्रमक भूमिका घेत असल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी केला आहे. भारत पाश्चिमात्य देशांचा लाडका देश असून भारताची भूमिका नेहमीच शेजारील देशांप्रति वर्चस्ववादी राहिली असल्याची मुक्ताफळे खार यांनी उधळली आहेत.
'पाकिस्तान गव्हर्नन्स फोरम २०२३' ला संबोधित करताना रब्बानी यांनी भारताला पाश्चिमात्य देशांचा लाडका असल्याचे म्हटले आहे. भारताने पाश्चिमात्य देशांची मर्जी सांभाळण्याचे धोरण राबवले आहे. पण तो आपल्या शेजारी देशांप्रति अत्यंत आक्रमक आहे. रब्बानी यांच्या म्हणण्यानुसार भारत इतर देशांसोबत मोकळेपणाने वागतो; पण पाकिस्तानच्या बाबतीत असे नाही. भारत आपल्या शेजाऱ्यांबाबत अतिशय संकुचित वृत्तीचा असल्याचे खार यांनी सांगितले. त्याचवेळी खार यांनी याच कार्यक्रमात चीनचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, पाकिस्तान खूप चांगले काम करत आहे. चीनशी आमचे संबंध खूप चांगले आहेत. आमचे आर्थिक संबंधही मजबूत आहेत.